साध्वी शिवानी दुर्गा यांना हवे संरक्षण
By Admin | Updated: September 2, 2015 23:34 IST2015-09-02T23:33:38+5:302015-09-02T23:34:14+5:30
अंनिसकडून हल्ल्याची भीती

साध्वी शिवानी दुर्गा यांना हवे संरक्षण
नाशिक : अघोरी विद्येच्या सहाय्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा तपास लावण्याचा दावा करणाऱ्या साध्वी शिवानी दुर्गा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
गेल्या आठवड्यात साध्वी शिवानी यांनी त्र्यंबकेश्वरच्या जंगलात काही तरी अघोरी साधना केली व त्यानंतर याच साधनेच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी शोधू शकतो, असा दावा केला होता. त्यांच्या या दाव्याला खोटे ठरवित नाशिकच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी साध्वी शिवानी यांना आव्हान दिले होते व त्यापोटी बक्षीसही जाहीर केले होते. या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर आता साध्वी शिवानी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान आपण स्वीकारल्याने या समितीचे कार्यकर्ते आपल्यावर संतप्त झाले असून, कोणत्याही क्षणी ते आपल्यावर हल्ला करतील, अशी भीती या पत्रात व्यक्त करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात पोलीस अधीक्षकांना योग्य त्या कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)