शिधापत्रिकेतील नावांसाठी साधूंचा दबाव
By Admin | Updated: August 11, 2015 23:58 IST2015-08-11T23:57:18+5:302015-08-11T23:58:05+5:30
मुख्यमंत्र्यांच्या नावे धमकी : प्रशासन वैतागले

शिधापत्रिकेतील नावांसाठी साधूंचा दबाव
नाशिक : ‘हमने कह दिया बस.... बीस से पच्चीस हजार साधू आएंगे, अब इन सबका आकडा लिखवा लो, अगर नही लिखवाते हो तो फिर देवेंद्रसे बात करेंगे, लगाए फोन गिरीश को?’ अशा शब्दात, तर कधी कधी उमा भारती, राजनाथसिंह या केंद्रीय मंत्र्यांच्या नावानेही टाकल्या जाणाऱ्या दबावाला प्रशासनातील अधिकारी वैतागले आहेत.
सध्या साधुग्राममधील आखाडे, खालशांना तात्पुरत्या शिधापत्रिका वाटप केल्या जात असून, त्यासाठी सेक्टरनिहाय पुरवठा निरीक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या निरीक्षकांनी थेट आखाडे व खालशांमध्ये जाऊन त्यांच्याकडून शिधापत्रिकेसाठीचा अर्ज भरून घेण्याच्या सूचना आहेत व पुराव्या- दाखल प्लॉट वाटपाचे पत्र त्यासाठी आवश्यक करण्यात आले आहे.
प्रतिव्यक्तीस एका महिन्यासाठी पाच किलो धान्य रास्त दरात दिले जाणार असून, त्यासाठी खालसे, आखाड्यांमध्ये प्रत्यक्ष वास्तव्यास असणाऱ्या साधूंनाच त्याचा लाभ देण्याचे शासनाचे धोरण आहे. प्रत्यक्षात मात्र पुरवठा निरीक्षकांवर दबाव टाकून दहा ते पंचवीस हजार साधू-भाविक येणार असल्याचे सांगून अशा सर्वांसाठी रास्त दरात अन्नधान्य मिळावे, असा खालशांचा आग्रह आहे. जो मान्य करणे प्रशासनाला शक्य नाही; परंतु याबाबत त्यांना सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या थेट पालकमंत्री, मुख्यमंत्री व केंद्रीयमंत्र्यांच्या नावे धमकी दिली जात आहे. एकेका आखाडा व खालशांनी दिलेली संख्या व त्याप्रमाणात धान्यवाटप करण्यासाठी ठरविण्यात आलेले प्रमाण पाहता सध्या शासनाने उपलब्ध करून दिलेले धान्यदेखील अपुरे पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)