पावसाळ्यापूर्वी कांद्याची विक्री करण्यासाठी धावपळ; कोरोना चाचणीसाठी शेतकऱ्यांची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 10:40 AM2021-05-29T10:40:40+5:302021-05-29T10:41:14+5:30

Onions Market News: बारा दिवसांचा कडक लॉकडाऊन संपल्यानंतर जिल्ह्यातील बाजार समित्या सुरू झाल्या आहेत.

Rush to sell onions before the rains in Nashik | पावसाळ्यापूर्वी कांद्याची विक्री करण्यासाठी धावपळ; कोरोना चाचणीसाठी शेतकऱ्यांची कसरत

पावसाळ्यापूर्वी कांद्याची विक्री करण्यासाठी धावपळ; कोरोना चाचणीसाठी शेतकऱ्यांची कसरत

googlenewsNext

- संजय दुनबळे
नाशिक : खरीप हंगामासाठी लागणाऱ्या भांडवलाची तयारी आणि पावसात भिजून कांद्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीकडे  कल वाढला असून, बहुतेक बाजार समित्यांमध्ये शेतमाल विक्रीसाठी गर्दी होत आहे. यामुळे बाजार समिती प्रशासनाला गर्दी आवरताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 
बारा दिवसांचा कडक लॉकडाऊन संपल्यानंतर जिल्ह्यातील बाजार समित्या सुरू झाल्या आहेत. मात्र, एकाच सत्रात केवळ ५०० वाहनांतील शेतमालाचा लिलाव होत असल्याने आपल्या वाहनाची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू  असल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.  

कांद्याला मिळतोय सरासरी दर
 १,५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर सध्या सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी मिळत असल्याने कांदा विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. 
 ज्या शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीची सोय नाही त्यांना पावसाळ्यापूर्वी कांदा विकणे गरजेचे असल्याने बाजार समित्यांमध्ये गर्दी होत आहे. 
सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीत गुरुवारी १५,००० क्विंटल कांद्याची आवक झाली होती.  

चाचणीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा : बाजार समिती आवारात येणाऱ्या प्रत्येक घटकाची कोरोना चाचणी करणे आवश्यक असल्याने बाजार समित्यांच्या आवारात अँटिजन चाचणी केंद्र सुरू केली आहेत. या केंद्रांवर चाचणी करून घेण्यासाठीही शेतकऱ्यांच्या रांगा लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. एकदा केलेल्या चाचणीचा अहवाल आठ दिवस ग्राह्य धरला जात असल्याने ज्यांच्याकडे अधिक माल आहे, त्यांना वारंवार चाचणी करावी लागत आहे. 

पैशांची जमवाजमव करण्याचे आव्हान
- मागील वर्षीपासून घोंगावणाऱ्या कोरोनाच्या संकटामुळे शेती पूर्णपणे अडचणीत आली आहे. 
- त्यात यावर्षी सर्वच वस्तूंचे दर वाढल्याने खरीप हंगामाच्या भांडवलासाठी शेतकऱ्यांना उसनवारीने तर काहींना सावकाराकडून पैसे घ्यावे लागत आहेत. 
- ज्यांच्याकडे शेतमाल आहे ते माल विक्रीच्या तयारीत आहेत. मात्र, बाजार समित्यांना घालून दिलेल्या नियमांमुळे दररोज ५०० वाहनांतील मालाचाच लिलाव होत आहे.
- शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून, खरिपासाठी भांडवल कसे उभे करावे, असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाला आहे.  

बंदमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
- लॉकडाऊनच्या काळात बंदमुळे भाजीपाल्याचे लिलावही बंद होते. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. 
- भाजीपाला नाशवंत असल्याने तो मिळेल त्या भावात विकण्यासाठीही शेतकऱ्यांनी जीवाची पर्वा न करता नाशिक बाजार समितीबाहेरच वाहने उभी केली होती. यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी मनमानी किमतीने माल खरेदी केल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. 

Web Title: Rush to sell onions before the rains in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.