रणरणत्या उन्हात राजकीय पक्ष कार्यालयांमध्ये गर्दी

By Admin | Updated: May 1, 2017 00:22 IST2017-05-01T00:22:34+5:302017-05-01T00:22:45+5:30

मालेगाव : शहराच्या तपमानाने गेल्या महिनाभरापासून चाळिशी पार केली आहे. त्यातच येत्या २४ मे रोजी महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे

The rush of political party offices in the changing sun | रणरणत्या उन्हात राजकीय पक्ष कार्यालयांमध्ये गर्दी

रणरणत्या उन्हात राजकीय पक्ष कार्यालयांमध्ये गर्दी

मालेगाव : शहराच्या तपमानाने गेल्या महिनाभरापासून चाळिशी पार केली आहे. त्यातच येत्या २४ मे रोजी महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. सूर्य आग ओकत असताना शहराचे राजकीय वातावरणही कमालीचे तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या जनसंपर्क कार्यालयांमध्ये रणरणत्या उन्हात इच्छुकांनी हजेरी लावली आहे. तिकीट मिळविण्यासाठी फिल्डिंग लावत शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे.
महापालिकेचे नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. येत्या सहा मे पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. यामुळे तिकीट मिळविण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मनधरणी इच्छुकांकडून केली जात आहे. शहराच्या पश्चिम भागात भाजपा व शिवसेनेमध्ये सरळ लढत होत आहे. भाजपाचा सत्तेचा वारू चौखूर उधळल्यामुळे इच्छुकांची गर्दी जास्त आहे. त्यातच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उमेदवारी वाटप व इतर कारणांवरून धुसफूस सुरू झाली आहे. राज्य पातळीवरील नेत्यांनी यात हस्तक्षेप सुरू केला आहे. इच्छुकांच्या तीन वेगवेगळ्या याद्या वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आल्या आहेत. यातूनच एक यादी फायनल होण्याची शक्यता आहे. असे असले तरी तिकिटासाठी इच्छुकांनी पक्ष कार्यालयांमध्ये गर्दी केली आहे.
ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या सूचनेनुसार इच्छुकांना तिकीट वाटप केले जाणार आहे. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयातही दररोज गर्दी होत आहे. शिवसेनेकडे राज्यमंत्रिपद असल्यामुळे व यापूर्वी पश्चिम भागातून सर्वाधिक नगरसेवक निवडून देणारा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेकडे बघितले जाते. निष्ठावंत शिवसैनिकांसह इतर इच्छुकांची संख्या अधिक आहे. ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांचा तिकीट वाटपात कस लागणार आहे. तर शहराच्या पूर्व भागात काँग्रेस, जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम आदी पक्ष कार्यालयांमध्ये बैठका व इच्छुकांची हजेरी जोरदार वाढू लागली आहे. येत्या दोन दिवसांत सर्वच राजकीय पक्षांना अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध करावी लागणार आहे. असे असले तरी इच्छुकांच्या मनात धडकी भरली आहे. आपला पत्ता कट होऊ नये म्हणून सर्वच इच्छुकांनी पक्षांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजविण्यास सुरुवात केली आहे.
राजकीय पदाधिकारीही दिवसभर पक्ष कार्यालयात तळ ठोकून आहेत. पक्ष नेतृत्वाच्याही बैठका पार पडत आहेत. मॅरेथॉन चर्चेनंतर इच्छुक उमेदवाराला तिकीट द्यायचे की नाही याच्यावर खलबते सुरू आहेत. मनपा निवडणुकीमुळे राजकीय पक्षांच्या कार्यालयांना महत्व प्राप्त झाले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The rush of political party offices in the changing sun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.