कऱ्हीच्या ग्रामस्थांचे ग्रामविकास मंत्र्यांना साकडें
By Admin | Updated: September 12, 2015 22:37 IST2015-09-12T22:36:21+5:302015-09-12T22:37:51+5:30
मागणी : जलयुक्त शिवार योजनेत समावेश करा

कऱ्हीच्या ग्रामस्थांचे ग्रामविकास मंत्र्यांना साकडें
मनमाड : नांदगाव तालुक्यातील कऱ्ही गावाला अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात टॅँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. अनेक वर्षांपासन दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या गावाचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश करावा, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
नांदगाव व येवला तालुक्याच्या सरहद्दीवरील डोंगराळ
भागात वसलेल्या कऱ्ही या गावात पावसाच्या अल्पप्रमाणामुळे अनेक वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असते. २००२ सालापासून या गावी उन्हाळ्यात पिण्यासाठी शासनाकडून टॅँकर सुरू करण्यात आले आहेत.
दर वर्षी ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत असतो. कऱ्ही हे गाव पाणलोट क्षेत्रात येत असूनही हेतूपुरस्कर जलयुक्त शिवार योजनेतून गावास टाळ्ण्यात आले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
तहसील कार्यालय, पंचायत समिती, तालुका कृषी विभागाकडे वारंवार मागणी करूनही जलयुक्त शिवार योजनेमध्ये कऱ्ही गावाचा समावेश करण्यात आलेला नाही.
सदर योजना गावात नसल्याने शेतकरीवर्गाला मोठे नुकसान सोसावे लागत आहे. तरी ग्रामस्थांच्या मागणीच्या निवेदनाचा सहानुभूती पूर्वक विचार करून जलयुक्त शिवार मोहीम सुरू करावी, या मागणीसाठी कऱ्ही ग्रामस्थांच्या वतीने सरपंच आशाबाई काकड, सोसायटी अध्यक्ष सुधाकर घुगे, उपसरपंच दशरथ लहिरे, ग्रा.पं. सदस्य देवराम ढाकणे, गोरख सोनवणे, वाल्मीक लहिरे, सोमनाथ डोंगरे, साईनाथ दराडे, वाल्मीक सानप, अण्णा घुगे, रामकृष्ण डोंगरे, चिंतामण डोमाडे, भावराव घुगे यांच्या शिष्टमंडळाने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले. (वार्ताहर)