ओझर-शिर्डी विमानतळापर्यंतचा रस्ता हरवला खड्ड्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 17:57 IST2019-12-11T17:56:33+5:302019-12-11T17:57:16+5:30
सिन्नर- नावलौकिक मिळालेल्या शिर्डी देवस्थानाला विमानतळ सुुरु करण्यात आले. ओझर ते शिर्डी या दोन विमानतळांना जोडणारा रस्त्याही बनविण्यात आला. मात्र राज्यमार्गाची वाट लागली असून सदर रस्ता खड्ड्यात हरवल्याने नागरिकात नाराजी व्यक्त होत आहे.

ओझर-शिर्डी विमानतळापर्यंतचा रस्ता हरवला खड्ड्यात !
वाहनधारकांना खड्ड्यांमधून मार्ग काढावा लागत आहे. ओझर ते वावीपर्यंत रस्त्याची मोठी दूरवस्था झाली असून वावीपासून शिर्डी विमानतळापर्यंत रस्ता सुस्थितीत आहे. ओझर ते शिर्डी या दोन विमानतळांना जोडला जाणारा राज्यमार्ग (क्र . ३५) हा गेल्या दोन-तीन वर्षांपासून अतिशय दयनीय अवस्थेत आहे. रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे तयार झाले असून डांबर व खडी उखडून रस्त्याची चाळण झाली आहे. त्यात परतीच्या अवकाळी पावसाची भर पडल्यामुळे हा रस्ता एक प्रकारे अपघातास निमंत्रण देत आहे. गुजरात राज्यातील साईभक्तांना नाशिक (पंचवटी) हे तीर्थस्थान करून शिर्डीला येण्यासाठी ओझरमार्गे हा राज्यमार्ग सोयीचा आहे परंतु याच मार्गावर सायखेडा, भेंडाळी, हिवरगाव, वडांगळी, निमगाव देवपूर, पंचाळे आदी गावांजवळ जागोजागी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे छोटे-मोठ्या अपघातांना हकनाक बळी पडावे लागत आहे. गेल्या आठ वर्षापासून तयार झालेला हा राज्यमार्ग अजूनही मिठसागरे दरम्यान अपूर्ण अवस्थेत आहे. सदर रस्त्याची खडी टाकून डागडुजी करून गैरसोय दूर करावी, अथवा डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.