भोरटे शिवारात जाणारा रस्ता रहदारीसाठी बंद
By Admin | Updated: March 26, 2017 22:58 IST2017-03-26T22:58:38+5:302017-03-26T22:58:55+5:30
पिळकोस : कळवण तालुक्यातील नवी बेज येथील राज्य महामार्ग क्र मांक १७ वरील सबस्टेशनला लागून असलेल्या भोरटे शिवारात जाणारा रस्ता सात ते आठ महिन्यांपासून रहदारीसाठी पूर्णत: बंद झालेला आहे.

भोरटे शिवारात जाणारा रस्ता रहदारीसाठी बंद
पिळकोस : कळवण तालुक्यातील नवी बेज येथील राज्य महामार्ग क्र मांक १७ वरील सबस्टेशनला लागून असलेल्या भोरटे शिवारात जाणारा रस्ता सात ते आठ महिन्यांपासून रहदारीसाठी पूर्णत: बंद झालेला असून, केबल टाकण्यासाठी खोदलेली चारी ठेकेदाराने न बुजविल्याचा हा परिणाम असल्याचे कळते. त्यावेळेस भोरटे शिवारात जाणाऱ्या रस्त्याच्या सुरुवातीला फोरजी केबल टाकण्यासाठी खोलवर चारी करण्यात आली. मात्र संबंधित ठेकेदाराने हे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची चारी बुजवली नसल्याने या शिवारातील शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल बाहेर काढता येत नसल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदारास सदर रस्त्यावरील चारी बुजवून रस्ता वाहतुकीस सुरळीत करून देण्याची मागणी केली असता संबंधित ठेकेदाराकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. नवी बेज येथील गिरणा नदीकाठालगतच्या भोरटे शिवारात मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी असून, या शिवारातील सर्व शेती बारमाही बागायती असल्याने या शिवारातील शेतकऱ्यांचा हा पूर्वीपासूनचा वहिवाटीचा रस्ता आहे. आज रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोलवर चारी असून, मोठ्या प्रमाणात खडीचे ढीग असल्याने या रस्त्यावरून फक्त पायवाटेएवढी जागा येण्या-जाण्यासाठी आहे. आज शेतकऱ्यांचा गहू, कांदा, हरभरा काढणीवर आला असून, या परिसरात गहू काढणीसाठी हार्वेस्टर यंत्र, ट्रॅक्टर, गाडीबैल जाण्यासाठीचा पूर्वीपासून असलेला हा रस्ता वाहतुकीस बंद झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून, संबंधितांकडून शेतकऱ्यांचा हा रस्ता लवकरात लवकर वाहतुकीस सुरळीत करून मिळावा अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष देवीदास पवार, पोपटराव पवार, दिलीप देशमुख, जिभाऊ बच्छाव, दगा पवार, अतुल पवार, हरिदास बागुल, महेंद्र देवरे या शेतकरी बांधवांनी दिला आहे. (वार्ताहर)
शेतमाल बाहेर काढण्यासाठी कसरत
सध्या परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल काढणीवर आला असून, रस्त्यावर चारी केलेली असल्याने रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. शेतकऱ्यांनी सदर रस्ता सुरळीत करून मिळावा यासाठी संबंधित ठेकेदारास सांगूनही ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केल्याने आज शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाहेर काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचा काढलेला शेतमाल शेतात पडून आहे. या परिसरातील शेतकऱ्यांचे सदर रस्ता कधी सुरळीत करून मिळणार याकडे लक्ष लागून आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. आता तालुका प्रशासन याकडे किती गांभीर्यपूर्वक पाहते व काय भूमिका घेते याकडे लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.