गारपीटग्रस्तांना मदत वाटपात असमतोल आढळल्याने रास्ता रोको येवला-नांदगाव मार्गावर वाहतूक खोळंबली
By Admin | Updated: May 14, 2014 22:40 IST2014-05-14T20:20:45+5:302014-05-14T22:40:47+5:30
येवला : गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी, अनुदानाची मदतीच्या वाटपात, नुकसान कमी मदत अधिक तर काही ठिकाणी नुकसान अधिक व मदत कमी असा असमतोल घडल्यावरून, २६८ गारपीटग्रस्त शेतकर्यांनी राजापुरात रास्ता रोको.

गारपीटग्रस्तांना मदत वाटपात असमतोल आढळल्याने रास्ता रोको येवला-नांदगाव मार्गावर वाहतूक खोळंबली
येवला : गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी, अनुदानाची मदतीच्या वाटपात, नुकसान कमी मदत अधिक तर काही ठिकाणी नुकसान अधिक व मदत कमी असा असमतोल घडल्यावरून, २६८ गारपीटग्रस्त शेतकर्यांनी राजापुरात रास्ता रोको केल्याने येवला-नांदगाव मार्गावरची वाहतूक पाऊण तास खोळंबली, तहसीलदार शरद मंडलिक यांनी ग्रामस्थ, गारपीटग्रस्त आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्याने रास्ता रोको मागे घेतला गेला. मार्च महिन्यातील गारपिटीने कांद्यासह पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. कृषी सहाय्यकासह संबंधितांनी नुकसानीचे पंचनामे घटनास्थळी केले नाहीत त्यामुळे अनुदान वाटपात अनियमितता झाली असल्याचे अंदोलनकर्त्याचे म्हणणे आहे. पिकांचे नुकसान व मदतीचे आकडे याचा ताळेबंद जुळत नाही यामुळे राजापुरात मोठ्या प्रमाणावर नाराजी झाली.
ग्रामपंचायत सदस्य प्रमोद बोडके, भारत वाघ यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेतकर्यांनी राजापूरला रास्ता रोको केला.
नुकसानीचे फेरपंचनामे व्हावेत व गारपीटग्रस्तांना न्याय द्यावा या मागणीचे निवेदनही तहसीलदार मंडलिक यांना ग्रामस्थांनी दिले.
आंदोलनात वाल्मीक घुगे, निवृत्ती वाघ, भाऊसाहेब गरुड, अशोक अव्हाड, सुभाष वाघ, एकनाथ आव्हाड, रामनाथ भाबड, साहेबराव आव्हाड, बबन अलगड, साहेबराव बोडके, रमेश धात्रक, विजय धात्रक यांच्यासह राजापूर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.