शाकांबरी, लेंडी नदीच्या पाणीपातळीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:18 IST2021-09-09T04:18:31+5:302021-09-09T04:18:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नांदगाव : संतत व मुसळधार पावसामुळे रात्री १० वाजता येथील शाकांबरी व लेंडी नदीतील पाण्याची पातळी ...

शाकांबरी, लेंडी नदीच्या पाणीपातळीत वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव : संतत व मुसळधार पावसामुळे रात्री १० वाजता येथील शाकांबरी व लेंडी नदीतील पाण्याची पातळी वाढू लागली. दोन दिशांनी काटकोनात येणाऱ्या नद्यांच्या प्रवाहाचा दबाव एकमेकांवर कुरघोडी करू लागल्याने पात्रात मागच्या बाजूला पाण्याची पातळी वाढून ते पाणी किनाऱ्यावरील अतिक्रमणे तोडत शहरात घुसले. नदीपात्रात असलेली अतिक्रमणे त्यापूर्वीच उद्ध्वस्त झाली होती. परंतु, पुराचे पाणी शहरात येण्यासाठी अतिक्रमणांचा अडथळा कारणीभूत ठरला. याचा प्रत्यय २००९च्या पूरप्रसंगी आला होता. त्यामुळे यापुढे किमान नदीपात्रालगत अतिक्रमणे होणार नाहीत, हा सर्वसामान्यांचा समाज केवळ मनातच राहिला. अतिक्रमणधारकांना असलेले राजकीय पाठबळ, बदलीच्या पाट्या टाकणाऱ्या प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे गेल्या बारा वर्षांत पूर्वीपेक्षा अधिक जोमाने दुप्पट, तिप्पट अतिक्रमणे पुन्हा एकदा रस्त्यावर आली. तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी महापुराच्या पुढच्याच दिवशी नांदगावचा दौरा करून यंत्रणा कामाला लावली होती. जेसीबी, डंपर, ट्रक्टर व मनुष्यबळ आणून पंधरवड्यात परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात यश मिळाले. अतिक्रमणे वाहून गेली.
-----------------------
बाजारपेठांमध्ये पाणी घुसले
तालुक्यात लोहशिंगवे, भालूर व मोरझर या क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. साकोरे येथे संपर्क तुटला. या गावानजीकचा मोरखडी बंधारा शाकांबरी, लेंडी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने सांडव्याच्या विरुध्द बाजूने फुटला. न्यायडोंगरी देश नदीचे पाणी न्यायडोंगरी बाजारपेठेत घुसले. पावसाची १३३ मिमी एवढी विक्रमी नोंद झाली असली तरी प्रत्यक्षात पाऊस जास्त प्रमाणात झाला आहे.
------------------------
ठळक मुद्दे
*अनेक लहान नाले बंडिंग व बंधारे फुटल्याने शेकडो हेक्टर पिकांसह जमिनीची हानी झाली.
*ठिकठिकाणी रस्ते, मोरीवरील पुलांचे भराव वाहून गेले.
*नुकसानाचा आकडा निश्चित व्हायला तीन ते चार दिवस लागतील.
*महसूल यंत्रणेच्या मर्यादा उघड्या पडल्या.
*दहेगाव येथील राजेंद्र देवरे यांचे दोन बैल व दुचाकी तसेच महादू काकळीज यांची म्हैस पुरात वाहून गेली.