सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आरोग्य विषयक आढावा बैठक
By Admin | Updated: March 8, 2015 01:54 IST2015-03-08T01:53:17+5:302015-03-08T01:54:44+5:30
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आरोग्य विषयक आढावा बैठक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आरोग्य विषयक आढावा बैठक
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी पार पाडण्यासाठी शासनाकडून प्रतिनियुक्ती देण्यात येणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन महिने अगोदर पाठविण्यात यावे, जेणे करून त्यांना त्यांच्या जबाबदारीची व निश्चित नेमणुकीच्या ठिकाणाची माहिती करून देणे शक्य होणार असल्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आरोग्य विषयक आढावा बैठकीत महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी याबाबतची माहिती सादर केली. कुंभमेळ्यात प्रति नियुक्तीवर येणारे अधिकारी व कर्मचारी पर्यटनावरच भर देत असल्यामुळे ऐनवेळी कर्मचाऱ्यांच्या जुळवाजुळवीवर परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचे नियोजन करण्याबाबत ते जर अगोदर आले, तर रंगीत तालीम करून घेणे व त्यांच्या नावानिशी नियुक्त्यांची ठिकाणे निश्चित करणे शक्य होणार असल्याचे सांगितले. कुंभमेळ्यानिमित्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी १३ कोटी, तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी पावणे पाच कोटींच्या खर्चाचा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी केली जात असून, शासनस्तरावरून औषध खरेदीची प्रक्रिया सुरू असल्याचे ते म्हणाले. साधुग्राम व भाविकांच्या मार्गावर ३२ तात्पुरते दवाखाने, ३२ रुग्णवाहिका व २० रुग्णालये कायमस्वरूपी राहणार आहेत. याच मार्गावर आठ ठिकाणी इमर्जन्सी पथकेही ठेवण्यात येतील. शहरातील शासकीय, निमशासकीय रुग्णालये, खासगी रुग्णालये मिळून २२२ रुग्णवाहिकांचे नियोजन करण्यात आले असून, एकट्या शहरात ९८ रुग्णवाहिका असतील. भाविकांच्या वाहनतळांवरही आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे. कोणत्या ठिकाणावरील रुग्ण नेमक्या कोणत्या रुग्णालयात पोहोचवायचा याचेही नियोजन करण्यात येणार आहे. कुंभमेळ ऐन पावसाळ्यात असल्यामुळे दूषित पाण्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता गृहीत धरून प्रत्येक वाहनतळावर पाण्याचे गुणवत्ता नियंत्रण पथक कार्यान्वित करण्यात आले आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीसाठी नाशिक विभागातील व्यक्तींना अगोदर प्राधान्य देण्यात येणार असून, त्यानंतर राज्यातील इतर भागातून प्रसंगी मनुष्यबळ मागविले जाईल, असे आरोग्य उपसंचालक बी. डी. पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)