‘फ्रायडे रिलीज’वर मतमोजणीचा परिणाम
By Admin | Updated: May 15, 2014 22:23 IST2014-05-15T00:46:21+5:302014-05-15T22:23:44+5:30
नाशिक : शुक्रवार, दि. १६ रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल असल्याने या दिवशी शुक्रवार असूनही एकही हिंदी बिग बजेट सिनेमा रिलीज होणार नाही.

‘फ्रायडे रिलीज’वर मतमोजणीचा परिणाम
नाशिक : शुक्रवार, दि. १६ रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल असल्याने या दिवशी शुक्रवार असूनही एकही हिंदी बिग बजेट सिनेमा रिलीज होणार नाही. याउलट तीन मराठी चित्रपट या दिवशी प्रदर्शित होणार असून, दोन हिंदी चित्रटपटांनीदेखील प्रदर्शनाची जोखीम स्वीकारलेली आहे. असे असले तरी प्रदर्शनाच्या मार्गावर असलेले बिग बजेट चित्रपट पुढील आठवड्यात झळकण्याच्या तयारीत आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल येत्या १६ रोजी जाहीर होणार आहेत. त्यामुळे अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीच्या निकालाची प्रत्येकाला प्रतीक्षा आहे. योगायोगाने याच दिवशी शुक्रवारदेखील असून, दर शुक्रवारी नवीन चित्रपट प्रदर्शित होत असतात. मात्र निवडणुकीचा फिवर लक्षात घेऊन वितरकांनी नवीन चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिलेला आहे. असे असले तरी हिंदीतील ‘एम-३’ आणि ‘गॅँग आॅफ मुंबई’ हे दोन हिंदी चित्रपट रिलीज होणार आहेत, तर मराठीतील ‘मिसळपाव’ आणि ‘टाइमपास’ हे जबरदस्त स्टारकास्ट असलेले चित्रपट झळकणार आहेत. मिसळपाव आणि टाइमपास हे दोन्ही चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आहेत. परंतु निवडणूक निकालाच्या दिवशीच हे चित्रपट झळकणार असल्याने या चित्रपटांची उत्सुकता कमी होण्याची भीतीदेखील वितरकांमध्ये आहे. या दोन मराठी चित्रपटांबरोबरच मकरंद अनासपुरे यांचा आणखी एक चित्रपट याच दिवशी रिलीज होणार आहे. हिंदीतील दोन चित्रपट रिलीज होणार असले, तरी हे दोन्ही चित्रपट लो बजेट आणि नवख्या कलाकारांचे असल्यामुळे या चित्रपटाच्या यशापयशाविषयी फारशी चिंता व्यक्त केली जात नाही. परंतु आगामी शुक्रवार हे दणदणीत चित्रपटांचे असतील, असेही वितरकांनी सांगितले. (प्रतिनिधी)