पाळे खुर्द गावच्या ग्रामसभेत पाइपलाइनला विरोधाचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:15 IST2021-09-19T04:15:02+5:302021-09-19T04:15:02+5:30
पाळे खुर्द : येथील श्री अष्टभुजा देवीच्या आवारात पाळे खुर्द गावाचे नागरिक तथा माजी उपसरपंच नामदेव मुरलीधर ...

पाळे खुर्द गावच्या ग्रामसभेत पाइपलाइनला विरोधाचा ठराव
पाळे खुर्द : येथील श्री अष्टभुजा देवीच्या आवारात पाळे खुर्द गावाचे नागरिक तथा माजी उपसरपंच नामदेव मुरलीधर गांगुर्डे यांनी पाळे खुर्द गावच्या नागरिकांना आवाहन करून बोलावलेल्या ग्रामसभेसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती; परंतु ग्रामसभा घेण्यास पाळे खुर्दचे ग्रामसेवक वैभव पाटील यांनी असमर्थता दाखवल्याने नागरिकांनी पोलीस पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेऊन चणकापूर धरणातून कळवणला जाणाऱ्या पाइपलाइनला विरोधाचा ठराव मंजूर केला. चणकापूर धरणातून पाइपलाइनद्वारे कळवणला पाणीपुरवठा करण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. त्या पार्श्वभूमीवर पाळे खुर्द येथे माजी उपसरपंच नामदेव गांगुर्डे यांनी ग्रामसभेसाठी नागरिकांना आवाहन केले होते. त्यानुसार ग्रामस्थांनी गर्दी केली; परंतु ग्रामपालिकेची नव्याने ग्रामसभा घेता येणार नाही, असे सांगत ग्रामसेवक वैभव पाटील यांनी ग्रामसभा घेण्यास नकार दिला. त्यामुळे नागरिकांनी पोलीस पाटील अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेऊन चणकापूर धरणातून कळवणला पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्यास विरोध दर्शविला. तसा ठराव मंजूर करण्यात आला.
इन्फो
शेतकऱ्यांचाही विरोध
सभेत नामदेव गांगुर्डे, भरत शिंदे, सचिन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. त्याबरोबरच शेतकऱ्यांनीही यासंदर्भात आपल्याला गिरणा नदीचे पाणी मिळणार नसल्याबाबत प्रतिक्रिया नोंदवून पाइपलाइनला विरोध असल्याचे सांगत ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी आनंदा पाटील, हिरामण पाटील, सुभाष निकम, कैलास पाटील, नाना पाटील, उत्तम पाटोळे, धनराज पाटील, अनिल पवार, दिगंबर निकम, देवराम कचवे आदींबरोबर पाळे खुर्द गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो- १७ ग्रामसभा
170921\290017nsk_49_17092021_13.jpg
फोटो- १७ ग्रामसभा