नाशिककरांना दिलासा अन पाणीपट्टी दरवाढीचा विषय वगळला
By Suyog.joshi | Updated: December 15, 2023 19:38 IST2023-12-15T19:38:05+5:302023-12-15T19:38:21+5:30
नाशिक (सुयोग जोशी) : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चित असलेल्या स्थायी समितीने प्रस्ताविक केलेला पाणीपट्टी दरवाढीचा प्रश्न शुक्रवारी महासभेने ...

नाशिककरांना दिलासा अन पाणीपट्टी दरवाढीचा विषय वगळला
नाशिक (सुयोग जोशी) : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चित असलेल्या स्थायी समितीने प्रस्ताविक केलेला पाणीपट्टी दरवाढीचा प्रश्न शुक्रवारी महासभेने वगळला आहे. त्यामुळे नाशिककरांची जाचक पाणीपट्टीच्या वाढीतून मुक्तता झाली आहे, त्यामुळे एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. स्थायी समितीने पाणीपट्टी दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यामुळे एक एप्रिल २०२४ पासून नाशिककरांच्या घरात येणारे पाणी महागणार होते.
पाणीपट्टीच्या वाढीतून नाशिककरांचे कंबरडे मोडणार होते. पाणीपट्टीतील ६७ कोटींची तूट भरून काढण्यासाठी पाणीपट्टीच्या दरात तिपटीपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला होता. पाणीपुरवठ्यापोटी नागरिकांकडून सद्य:स्थितीत प्रति हजार लिटर पाण्यासाठी पाच रुपये दर आकारले जात आहेत. स्थायी समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार एक एप्रिल २०२४ पासून नवीन पाणीपट्टीवाढ लागू केली जाणार होती, मात्र घरगुती वापराच्या नळ कनेक्शनधारकांकडून २०२४-२५ या आर्थिक वर्षात प्रति हजार लिटर पाण्यासाठी १२ रुपये आकारले जाणार होते.
२०२५-२६ या आर्थिक वर्षात १३ रुपये, तर २०२६-२७ या आर्थिक वर्षात प्रति हजार लिटर पाण्यासाठी नागरिकांना १४ रुपये मोजावे लागणार हातेे. बिगरघरगुती पाणीवापरावाठी हेच दर प्रतिहजार लिटरसाठी २२ रुपयांवरून ३० ते ३५ व व्यावसायिक पाणी वापरासाठी २७ वरून ३५ ते ४० रुपये प्रतिहजार लिटर दर आकारले जाणार होते.
नाशिककर श्रीमंत अन...
माजी महापौर दशरथ पाटील यांनी पाणीपट्टी दरवाढीच्या निषेधार्थ घेतलेल्या पत्रकार परिषदेत थेट आयुक्तांना फोन लावला होता. त्यावेळी आयुक्त तथा प्रशासनाधिकारी डॉ. अशोक करंजकर यांनी या पाणीपट्टी दरवाढीचे समर्थन करतांना नाशिककर कुठे गरीब आहे, नाशिककर तर श्रीमंत असे म्हटले होते. त्यानंतर आयुक्तांच्या या विधानाची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यांनंतर पुन्हा आयुक्तांनी पत्रकार परिषदेत घेत पालकमंत्र्यांशी चर्चा करत ही दरवाढ मागे घेण्यात आल्याचे जाहीर केले होते. मात्र शुक्रवारच्या महासभेत दरवाढीचा विषयच तहकूब करत नाशिककरांना दिलासा दिला आहे.