विहिरीत पडलेल्या दुर्मीळ सशाची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 16:06 IST2019-06-10T16:06:27+5:302019-06-10T16:06:40+5:30
सिन्नर : तालुक्यातील खोपडी येथील दोन दिवसांपासून विहिरीत पडलेल्या जंगली सशाला वनविभाग व प्राणिमित्रांच्या प्रयत्नांनी जीवदान मिळाले.

विहिरीत पडलेल्या दुर्मीळ सशाची सुटका
सिन्नर : तालुक्यातील खोपडी येथील दोन दिवसांपासून विहिरीत पडलेल्या जंगली सशाला वनविभाग व प्राणिमित्रांच्या प्रयत्नांनी जीवदान मिळाले. जंगल परिसरात अन्न-पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याने वन्यजीव मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. बिबटे, माकडे, मोर यांचा पाण्याचा शोधार्थ मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. खोपडी शिवारात बस्तीराम दराडे, शिवनाथ दराडे यांनी पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेला जंगली ससा पाहिला. त्यानंतर वनविभाग तसेच प्राणीामित्र शिवम तारगे यांच्याशी संपर्क साधला. तारगे यांनी उमेश कडभाने, आदित्य देशमुख, मयूर जगताप, मुकेश वरंदळ यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाचे कर्मचारी थोरात हे देखील उपस्थित झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तारगे यांनी विहिरीत उतरून जंगली सशाला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर त्या सशाला मोहदरी वनउद्यानात सोडण्यात आले. सदर ससा अतिशय दुर्मिळ जातीचा असून ही जात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मोठ्या प्रमाणात शिकार होते. वन्यजीव धोक्यात असल्याचे आढळल्यास त्वरीत जवळच्या वनविभागाशी किंवा प्राणिमित्रांना कळवावे असे आवाहन शिवम तारगे, उमेश कडभाने यांनी केले.