फेरनियोजनासाठी राष्ट्रवादीची थेट मुख्यमंत्र्यांना साद
By Admin | Updated: August 30, 2015 23:23 IST2015-08-30T23:22:39+5:302015-08-30T23:23:10+5:30
सुरक्षेच्या अतिरेकाबाबत पोलीस प्रशासनाला सूचना

फेरनियोजनासाठी राष्ट्रवादीची थेट मुख्यमंत्र्यांना साद
नाशिक : पहिल्या पर्वणीत पोलिसांनी केलेल्या सुरक्षेच्या अतिरेकामुळे भाविकांचे व नाशिककरांचे मोठे हाल झाले तर झालेच शिवाय नाशिककरांनी याकडे पाठही फिरवली़ त्यामुळे उर्वरित दोन पर्वण्यांमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फेरनियोजन करावे, अशी मागणी आमदार जयवंत जाधव यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांकडे केली आहे़
पोलीस आयक्त एस़जगन्नाथन यांना दिलेल्या निवेदनात रामकुंड व कुशावर्तामध्ये स्नानासाठी भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने येतील अशी अपेक्षा होती़ मात्र पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव केलेला अतिरेक व प्रशासनाचे आडमुठे धोरण यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते़
पोलिसांनी गर्दीच्या नियोजनाची जबाबदारी टाळण्यासाठी संपूर्ण शहरात बॅरिकेडिंग करून नाकेबंदी केली. त्यामुळे किमान उर्वरित दोन पर्वण्यांचे तरी पोलिसांनी फेरनियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे़
याप्रसंगी मनपा स्थायी समिती अध्यक्ष शिवाजी चुंबळे, कविता कर्डक, शोभा मगर, विष्णुपंत म्हैसधुणे, देवांग जानी, छबू नागरे, चिन्मय गाढे, बालम पटेल, मकरंद सोमवंशी, मनोहर कोरडे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.