गोल्फ क्लबची माहिती देण्यास टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 00:35 IST2019-11-14T00:35:03+5:302019-11-14T00:35:49+5:30
गोल्फ क्लब येथे नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचे काम संथगतीने सुरू असून, हे काम कधी पूर्ण होणार यासाठी कॉँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी गोल्फ क्लब मैदान येथे बुधवारी (दि. १३) धरणे आंदोलन केले.

गोल्फ क्लबची माहिती देण्यास टाळाटाळ
नाशिक : गोल्फ क्लब येथे नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचे काम संथगतीने सुरू असून, हे काम कधी पूर्ण होणार यासाठी कॉँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी गोल्फ क्लब मैदान येथे बुधवारी (दि. १३) धरणे आंदोलन केले. विशेष म्हणजे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी त्याची दखल घेऊन शहर अभियंत्यांना माहिती घेऊन पाठवतो असे सांगितले खरे, परंतु नंतर अभियंता घुगे यांनी जाणे टाळले. त्यामुळे संतप्त झालेल्या पाटील यांनी आता येत्या महासभेत जाब विचारण्यात येईल, अशी भूमिका घेतली.
गोल्फ क्लबचे नूतनीकरण सुरू करण्यात आले असून, त्यासाठी जॉगिंग ट्रॅक बंद करण्यात आला आहे. सदरचे काम सुरू असतानाच वाढीव कामासाठी आर्थिक तरतूद करावी यासाठी ठेकेदाराने काम थांबवले आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून, हे काम कधी पूर्ण होणार याची माहिती दिली जात नाही डॉ. पाटील यांचा आरोप आहे. त्यामुळे जोपर्यंत काम केव्हा सुरू होणार आणि केव्हा नाही हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत गोल्फ क्लब येथे धरणे सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु त्यांना अखेरपर्यंत माहिती मिळालीच नाही. पाटील यांच्या समवेत प्रभाग सभापती वत्सला खैरे, उध्दव पवार, बबलू खैरे, दर्शन पाटील आणि सुनील आव्हाड यांच्यासह नागरिकांनी सहभाग घेतला.