नाशिक : आर्थिक व सुवर्ण तारणावर दरमहिना एक ते दीड टक्के व्याजाचे आमिष दाखवून मिरजकर सराफ व गंगापूररोडवरील त्रिशा जेम्सने गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे़ आर्थिक गुन्हे शाखेकडे आतापर्यंत ५०० गुंतवणूकदारांनी फसवणुकीच्या तक्रारी केल्या असून, गुंतवणूकदारांची संख्या हजारपर्यंत तर फसवणुकीची रक्कम शंभर कोटींपर्यंत असल्याची माहिती सोमवारी (दि़३०) गुंतवणूकदारांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन दिली़ दरम्यान, या दोन्ही फर्ममधील फरार संचालकांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे़ याबरोबरच संचालकांचे बँक खाते गोठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या पेढ्यांमधील डाटासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली जाणार आहे़ अॅड. पल्लवी उगावकर-केंगे यांच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मिरजकर सराफी पेढीचे महेश मिरजकर, हर्षल नाईक यांच्यासह ११ संचालक-कर्मचाऱ्यांविरोधात १९ जुलै रोजी फसवणूक तसेच महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे़ हा गुन्हा शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे़ आतापर्यंत सुमारे पाचशे गुंतवणूकदार पोलिसांपर्यंत पोहोचले असून, फरार संचालकांपर्यंत अद्याप पोलीस पोहोचलेले नाहीत़
फरार संचालकांविरोधात ‘रेडकॉर्नर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 01:37 IST