साधुग्राममधील पाइपचा पुनर्वापर
By Admin | Updated: January 16, 2016 01:08 IST2016-01-16T00:48:23+5:302016-01-16T01:08:05+5:30
साडेसहा कोटींची बचत : पाणीपुरवठ्याची कामे मार्गी

साधुग्राममधील पाइपचा पुनर्वापर
नाशिक : सिंहस्थ कुंभपर्वणी काळात महापालिकेने तपोवनातील साधुग्राममध्ये पाणीपुरवठ्यासाठी टाकलेल्या सुमारे ३९ हजार मीटर लांबीच्या पाइपचा पुनर्वापर शहरातील सहाही विभागात ठिकठिकाणी केला जाणार असून त्यामुळे महापालिकेची सुमारे साडेसहा कोटी रुपयांची बचत होणार आहे. प्रशासनाने त्या संदर्भात विभागनिहाय पाइपलाइन टाकण्याच्या कामांची प्राकलने तयार केली आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेमार्फत तपोवनासह सुमारे ३३५ एकर जागेत साधुग्रामची उभारणी करण्यात आली होती. साधुग्राममध्ये साधू-महंतांसह भाविकांसाठी पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र पाइपलाइन टाकण्यात आली होती. याशिवाय पंचवटीतील निलगिरी बागेत २० लक्ष लिटर्स क्षमतेचा जलकुंभ, जुन्या लुंगे जलकुंभाशेजारील आवारात २० लक्ष लिटर्स क्षमतेचा जलकुंभ तसेच निलगिरी बागेतच ५० दशलक्ष लिटर्स क्षमतेचे जलशुद्धिकरण केंद्रही खास साधुग्रामसाठी उभारण्यात आले होते. सदर जलकुंभांपासून साधुग्रामसाठी मुख्य जलवाहिनी तसेच अंतर्गत जलवाहिन्याही टाकण्यात आल्या होत्या.
या जलवाहिना टाकताना त्यांचा पुनर्वापर करता येईल, अशाच उद्देशाने महापालिकेमार्फत काम करण्यात आले.