मनपा माध्यमिक शाळांमध्ये मानधनावर शिक्षक भरती
By Admin | Updated: June 8, 2017 18:17 IST2017-06-08T18:17:16+5:302017-06-08T18:17:16+5:30
उर्दू-मराठी माध्यम : स्थायीच्या निर्णयानुसार कार्यवाही

मनपा माध्यमिक शाळांमध्ये मानधनावर शिक्षक भरती
नाशिक : महापालिकेत सरळ सेवेने कुठल्याही प्रकारच्या नोकर भरतीस बंदी असल्याने स्थायी समितीच्या अधिकारात सहा महिन्यांच्या कालावधीकरिता मनपाच्या ४ अनुदानित तर ९ विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांची २१ रिक्त पदे भरण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. सद्यस्थितीत संबंधित शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या जास्त असतानाही त्यातुलनेत शिक्षक उपलब्ध नसल्याने शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत आहे.
महापालिकेच्या मराठी माध्यमिक विनाअनुदानित माध्यमिक शाळांमधील १७ शिक्षकांची पदे तसेच उर्दू माध्यम अनुदानित माध्यमिक शाळांमधील ४ शिक्षकांची पदे भरण्यासाठी शिक्षण विभागाने स्थायी समितीपुढे प्रस्ताव ठेवला होता. महापालिकेने माध्यमिक शाळा उघडल्या परंतु, शिक्षकांच्या नेमणुकीबाबत अनास्थाच दाखविली गेली. सद्यस्थितीत संबंधित शाळांमध्ये चांगल्या प्रमाणात विद्यार्थी पटसंख्या आहे, परंतु शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. पुरेसे शिक्षक नसल्याने एका शिक्षकावरच अतिरिक्त ताण येत आहे. शासनाने महापालिकेत नोकर भरतीस मनाई केली असल्याने मानधनावर शिक्षक भरतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. सदर प्रस्तावास मागील महिन्यात स्थायी समितीने मंजुरी दिली होती. त्यानुसार, माध्यमिक शाळांमधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाने सुरू केली आहे. सदर पदे ही सहा महिन्यांच्या कालावधीसाठी भरण्यात येणार असून, मासिक ८ हजार रुपये मानधन असणार आहे. दरम्यान, शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर मानधनावर का होईना शिक्षक भरतीसाठी बेरोजगारांकडून विचारणा सुरू झाली आहे.