कोरोना आडून पुन्हा ३०० सफाई कामगार भरतीचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:14 IST2021-04-10T04:14:26+5:302021-04-10T04:14:26+5:30

कोरोनाचे संकट असल्याने सध्या प्रशासनाला व्यापक अधिकार प्राप्त आहेत. त्यातच कोरोनाचे संकट अधिक गडद होत असल्याने काही मोजके लोकप्रतिनिधी ...

Recruitment of 300 cleaners from Corona | कोरोना आडून पुन्हा ३०० सफाई कामगार भरतीचा घाट

कोरोना आडून पुन्हा ३०० सफाई कामगार भरतीचा घाट

कोरोनाचे संकट असल्याने सध्या प्रशासनाला व्यापक अधिकार प्राप्त आहेत. त्यातच कोरोनाचे संकट अधिक गडद होत असल्याने काही मोजके लोकप्रतिनिधी वगळता अन्य कोणीही खरेदी, निविदांच्या घोळात नाहीत. हीच संधी घेऊन आता वेगवेगळे प्रकार सुरू झाले आहेत. कोविड बाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी तीन विद्युत शवदाहिनी बसविण्यावरून गोंधळ सुरू असताना गेल्या सोमवारी झालेल्या खातेप्रमुखांच्या बैठकीत एका अधिकाऱ्याने आता रुग्णालय स्वच्छतेसाठी सफाई कामगार कमी पडत असून, तातडीने ३०० सफाई कामगार घेण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार आता सध्या ठेकेदाराकडून ७०० कामगार आउटसोर्सिंगने घेण्यात आले. त्याच ठेकेदाराकडून आणखी ३०० कामगार घेऊन त्यांच्यामार्फत रुग्णालयांच्या सफाईचा घाट घातला जात आहे.

मुळातच महापालिकेतील आऊटसोर्सिंगचा ठेका वादग्रस्त असून, त्यास महापालिकेतील सफाई कामगारांच्या संघटनांचा विरोध आहे. मात्र, त्यानंतरही त्याच ठेकेदाराकडून ३०० सफाई कामगार घेण्याच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या एकंदर भूमिकेमुळे शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे.

इन्फो..

कंत्राटी पद्धतीने का नाही?

महापालिकेत सध्या वैद्यकीय विभागासाठी डॉक्टर, नर्स, परिचारिका, आया, वॉर्डबॉय हे सर्वच तीन महिन्यांच्या कंत्राटावर घेतले जात आहेत. मग तीन महिने कालावधीसाठी याच पद्धतीने ३०० सफाई कामगारदेखील वॉक इन इंटरव्ह्यूतून घेता येऊ शकतात. तसेच तीन महिने कालावधीसाठी घेतल्यामुळे अन्य दायित्व महापालिकेवर राहणार नाही. असे असताना आता एकाच ठेकेदाराकडून भरतीचा अट्टाहास कशासाठी असादेखील प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Recruitment of 300 cleaners from Corona