कर्करोग तपासणीचा विक्रम
By Admin | Updated: January 2, 2017 01:31 IST2017-01-02T01:31:04+5:302017-01-02T01:31:17+5:30
शिबिर : लिम्का बुकमध्ये नोंद होण्याचा आयोजकांचा दावा

कर्करोग तपासणीचा विक्रम
नाशिक : महाआरोग्य शिबिरात मानवता क्युरी सेंटरतर्फे एकाच वेळी एकाच ठिकाणी सर्वाधिक कर्करोग रुग्णांची तपासणी करण्यात आल्याचा दावा आयोजकांनी केला असून, याची लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्येही नोंद होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. त्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली असून, संबंधित नोंद लिम्का बुक आॅफ वर्ल्ड व गिनीज बुक आॅफ वर्ल्डमध्ये नोंद होण्यासाठी आवश्यक चित्रीकरण व दस्तावेज पाठविण्यात आले आहे.
राजपत्रित अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके, जिल्हा आरोग्य अधिकारी सुशील वाक्चौरे व तहसीलदार राजश्री अहिरराव यांच्या उपस्थितीत तपासणीच्या प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात आले. विक्रमाच्या नोंदीसाठी आवश्यक दस्तऐवजावर अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचेही अखंडित चित्रीकरण करण्यात आले आहे. यापूर्वी लिम्का बुकमध्ये १२५० रुग्णांची तपासणी करण्याचा विक्रम आहे. तर गिनीज बुकात कर्करोगाच्या एकत्रित तपासणीची नोंद नाही. अशास्थितीत कॅन्सरचे १७४५ रुग्ण तपासण्यात आले. यात १६०० स्त्रियांची कर्क रोग तपासणी करण्यात आली असून, ५० स्त्रियांना गर्भाशयाचा कर्करोग, ५० स्त्रियांना स्तनाचा , ३५ स्त्रियांना थायरॉईडचे निदान झाले. ९ रुग्णांना रक्ताचा, ९० रुग्णांना तोंडाचा कर्करोग व अन्य १५ ते १६ रुग्णांना विविध कर्करोगांचे निदान झाले आहे. ही संख्या लिम्का बुकमधील नोंदीपेक्षा मोठी असल्याने विक्रमाची नोंद होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.