येवल्यात कांद्याची विक्रमी आवक
By Admin | Updated: December 22, 2015 00:02 IST2015-12-21T23:57:12+5:302015-12-22T00:02:38+5:30
निर्यातमूल्य : आगामी काळात भाव घसरण्याचा जाणकारांचा अंदाज; शेतकरी अडचणीत

येवल्यात कांद्याची विक्रमी आवक
येवला : येवला बाजार समितीत सोमवारी ११२० ट्रॅक्टरमधून २३ हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. या हंगामातील ही विक्र मी आवक असून, कांदा बाजारभाव सध्या स्थिर असल्याचे चित्र असले, तरी निर्यातमूल्य जर किमान २०० रु पये प्रति डॉलरपर्यंत कमी झाले नाहीत तर निर्यातीचे गणित कोलमडेल. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कांद्याचे भाव घसरतील व शेतकऱ्यांची चिंता वाढेल, असा अंदाज जाणकार मंडळी व्यक्त करीत आहेत.
येवला मार्केट यार्डवर कांद्याचे बाजारभाव किमान ५०० ते १४५१
रु पये असून सरासरी १०५० रु पये प्रती क्विंटल होते. येवला बाजार आवारात नांदगाव, वैजापूर या तालुक्यातील सुमारे ७० टक्के तर येवला तालुक्यातून केवळ ३० टक्के कांदा येवला बाजार आवारात आल्याचे चित्र पहावयास मिळाले. सध्या सर्वच कांदा बाजारात आवक वाढत आहे. कांद्याचे निर्यातमुल्य ७०० रुपयावरून ४००
रुपये प्रती डॉलर एवढे कमी केले असले तरी निर्यात फारशी समाधानकारक नसल्याचे चित्र आहे. चीन मध्ये कांदा निर्यातमूल्य केवळ ३०० रुपये प्रती डॉलर आहे.तर पाकिस्तान मधील कांदा निर्यातमूल्य शून्य आहे. भारतात कांदा निर्यातमूल्य सध्या ४०० रु पये प्रती डॉलर आहे. या परिस्थितीत, चीन व पाकिस्तानचा कांदा, श्रीलंका, दुबई, सिंगापूर, फिलिपिन्स, मलेशिया या देशात निर्यात केला असता त्या देशात हा कांदा पोहोचेपर्यंत त्याचे मूल्य १८०० ते २००० रु पये प्रतिक्विंटलपर्यंत जाते. या तुलनेत भारताचा कांदा निर्यातीनंतर त्याचे परदेशातील मूल्य २२०० ते २४०० रु पये प्रतिक्विंटलपर्यंत जाते. त्यामुळे निर्यातदार नाखूश आहेत. व्यापारात दोन पैसे मिळाल्याशिवाय निर्यात कशी शक्य आहे. भारतीय कांदा अन्य देशाच्या तुलनेत महाग असल्याने परदेशातून भारतीय कांद्याला मागणी अत्यंत कमी झाली आहे.
सध्या परदेशात चीन आणि पाकिस्तानच्या कांद्याने बाजारपेठ काबीज केली आहे. कांद्याची निर्यात कमी होत असली तरी आगामी १० ते १२ दिवसांनंतर भारतात आंतरराज्यीय बाजारपेठेत मागणीपेक्षा पुरवठा अधिक होण्याची शक्यता असल्याने आगामी १२ ते १५ दिवसात कांद्याचे बाजारभाव कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक गर्तेत सापडेल.
निर्यातमूल्य शून्य करावे
गेल्या महिनाभरात सरासरी कांद्याचे बाजार भाव २२०० रु पये प्रती क्विंटल पासून एक हजार पन्नास रु पये पर्यंत घसरले आहेत.आता निर्यातमूल्य ४०० रु पये प्रती डॉलर केल्याने कांद्याला स्थिर भाव देण्यास मदत होणार असल्याचा अंदाज होता. परंतु निर्यात मूल्य आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या तुलनेत अधिकच असल्याने हवी तेवढी निर्यात होत नसल्याने निर्यातमूल्याचा फटका अजूनही बसत आहे. सध्या देशांतर्गत मागणीपेक्षा मोठ्या प्रमाणावर कांदा देशातच राहत आहे. शिवाय कांद्याची आवक वाढत असल्याने देशांतर्गत गरज पूर्ण झाल्यानंतर कांद्याचे भाव कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. केंद्राने कांद्याचे निर्यात मूल्य शून्य केले, तर देशांतर्गत कांद्याची गरज पूर्ण होवून परदेशात कांदा निर्यांत होईल व देशांतर्गत कांद्याचे भाव ंकोसळणार नाहीत, आता केंद्राने शेतकरी हिताची भूमिका पार पाडावी लागेल. आगामी दोन महिन्यात येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर कांदा येणार आहे.