महसूल प्रशासनाचा काणाडोळा

By Admin | Updated: April 14, 2016 23:40 IST2016-04-14T23:24:44+5:302016-04-14T23:40:24+5:30

महसूल प्रशासनाचा काणाडोळा

Reasonable revenue administration | महसूल प्रशासनाचा काणाडोळा

महसूल प्रशासनाचा काणाडोळा

नांदगाव : कायदा धाब्यावर बसवून नदीपात्रातच वीटभट्ट्या नांदगाव : तालुक्यातील जलस्त्रोतांची क्षमतेच्या नीचांकाकडे वाटचाल सुरू असताना व पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती नजीकच्या काळात येऊ घातली असल्याच्या पार्श्वभूमीवर दुसरीकडे शासनाचे व पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून नदीपात्रात असलेल्या अवैध वीटभट्ट्यांना पाणी कसे मिळते आणि दिवसेंदिवस गावाकडे सरकणाऱ्या या भट्ट्यांना महसूल विभागाचे संरक्षण कसे मिळते? याचे उत्तर प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी देतील का? जमिनींच्या नावांमधले फेरफार व बेकायदेशीर प्रकरणांची माहिती अधूनमधून चव्हाट्यावर येत असताना मूग गिळून बसलेले प्रशासन वीटभट्ट्यांच्या बाबतीतसुद्धा का गप्प आहे.
काही वर्षे आधी नांदेश्वरी देवीलगत सरकलेल्या भट्ट्या तत्कालीन प्रशासनाने हटविल्या. पण वर्ष दोन वर्षात त्या पुन्हा गावाकडे सरकल्या. त्याकडे काणाडोळा केला जात आहे. तलाठी, मंडल अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे संशयाची सुई त्यामुळे फिरत असते.
पाणी बचतीचे महत्त्व शिरपूर पॅटर्नमधून कळाले असले व शासन स्तरावर त्याचा डंका पिटला जात असला तरी नांदगावची महसूल यंत्रणा जणू काही घडलेले नाही अशा आविर्भावात या प्रकाराकडे बघत आहे. नदीचे वाळवंट बनलेल्या नांदगावच्या शाकांबरी व तिच्या उपनदीचे नदीपात्र जणू पैसे कमविण्याचे कुरण बनले आहे. अतिक्रमणांमुळे नांदगाव मधील नद्यांची अवस्था तर जवळजवळ गटारांसारखी झाली आहे.
तालुक्याच्या प्रशासनाचा गाडा गेल्या काही महिन्यात लुळापांगळा झाल्याचा बोलबाला आहे. पाऊस पडत नाही म्हणून नदीपात्रांची वाट लावत त्याकडे संवेदनाहीन नजरेने बघायचे. नोव्हेंबर २००९ मध्ये अचानक आलेल्या अवकाळी पावसाने या शहाराची भीषण अवस्था करून ठेवली होती. त्याची दखल घेत तत्कालीन प्रांताधिकारी अजय मोरे, तहसीलदार सुनील गाढे यांनी नदीपात्रांच्या स्वच्छतेला प्राधान्य देत कारवाईचा बडगा उगारला होता. त्यानंतर काही काळ लोटत नाही तोच पहिले पाढे पंचावन्न या न्यायाने नदीपात्र गिळंकृत करण्याचा झपाटा सुरु जाला. तो इतका की आता ऐन नदीपात्राच्या मध्यभागातच अतिक्रमणांचे बस्तान थाटले आहे.
हे कमी पडते की काय म्हणून, आता ...नदीपात्राच्या मध्यातच रोजरोस वीटभट्ट्या सुरू झाल्या आहेत. त्यांना असे परवाने देताना गौणखनिज कायद्याच्या कोणत्या नियमान्वये त्या दिल्या. याचा खुलासा तहसीलदार अनिल गवांदे यांना देता आला नाही.
वीटभट्ट्यांमधून सल्फर डायआॅक्साइड, कार्बन डायआॅक्साइड, कार्बन मोनाक्साइड आणि नायट्रोजन आॅक्साइड या विषारी वायूंचे उत्सर्जन होते.
या विषारी वायुंमुळे होणारे डोळ्यांचे विविध विकार, श्वसनाचे आजार, त्वचेचे रोग हे कॉमन आहेत. वीटभट्ट्यांमुळे हवेतल्या कार्बनचे प्रमाण वाढून परिसरातील तपमानात वाढ होते. त्याचा परिणाम शेती व आरोग्यावर होत असतो. मात्र सब कुछ चलता है चा नारा महसूल विभाग किती बेफिकीरीने देत असतो व सामान्यांच्या जीवनाकडे दुर्लक्ष करत असतो याचे नांदगाव मधील उपरोल्लिखित उदाहरण एक ‘आदर्श’ उदाहरण ठरले तर वावागे वाटू नये.
बेकायदेशीर वीटभट्ट्यांवर प्रतिबंध घालणे हे स्थानिक तहसील प्रशासनाकडून अपेक्षित असते. मात्र नांदगावच्या महसूल यंत्रणा या गंभीर समस्येकडे गंभीरतेने पाहात नसल्याकारणाने बिनबोभाटपणे सगळीकडे बेकायदेशीर वीटभट्ट्या सुरु होत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Reasonable revenue administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.