रेडिमेड गारमेंट साड्यांची दालने गजबजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:46 IST2018-10-30T00:45:40+5:302018-10-30T00:46:04+5:30
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील रेडिमेड कपडे आणि साड्यांची दालने गजबजली आहेत. शहरातील विविध दालनांतून महिलावर्गाकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू आहे. डिझायनर साड्या आणि ड्रेस मटेरियल्सला महिला वर्गाची विशेष पसंती मिळते आहे. शहरात साड्या आणि कपड्यांची १०० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

रेडिमेड गारमेंट साड्यांची दालने गजबजली
नाशिक : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील रेडिमेड कपडे आणि साड्यांची दालने गजबजली आहेत. शहरातील विविध दालनांतून महिलावर्गाकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू आहे. डिझायनर साड्या आणि ड्रेस मटेरियल्सला महिला वर्गाची विशेष पसंती मिळते आहे. शहरात साड्या आणि कपड्यांची १०० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दिवाळीचे आणि दिव्यांचे, फराळाचे नाते जसे घट्ट तसेच ते फटाके आणि नवे कपडे यांचेही नेमके हेच समीकरण आहे. जवळपास सर्वच शासकीय आणि खासगी कर्मचा-यांच्या हाती बोनसचा पैसा खेळू लागल्याने शहरात दिवाळीच्या खरेदीने जोर धरला आहे. खरेदीत महिलावर्गाने आघाडी घेतली असून, शहरातील जवळपास सर्वच नामांकित साड्यांची दालने नववधूप्रमाणे सजली आहेत. दिवाळी आणि त्यानंतर दहाच दिवसांनी लागणारी लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर शहरातील साड्यांच्या दालनात विविध आकर्षक आॅफर्सही देण्यात आल्याने साड्यांची खरेदी जोरात आहे. काही दुकानदारांनी आकर्षक भेटवस्तूही ग्राहकांना देण्यास सुरुवात केल्याने ग्राहकवर्ग खूश आहे. नव्या पॅटर्नमधील ड्रेस मटेरियल अगदी पाचशे रुपयांपासून बाजारात उपलब्ध असल्याने तरुणी व महिला वर्गाकडूनही याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लहान मुलींच्या रेडिमेड साड्या, घागरा-चोली तर मुलांसाठी धोती-कुरता आणि ब्लेझर वेस्कट आदी कपडेही लक्ष वेधून घेत आहेत.
नवा ट्रेण्ड येतोय
दिवाळी आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर केवळ शालू किंवा दुल्हन साडी खरेदी करायचा ट्रेण्डमागील काही वर्षांपर्यंत दिसून येत होता; मात्र आता दुल्हनकडून घागरा-ओढणीलाही पसंती दिली जात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण यंदा ४० टक्क्यांनी वाढले आहे. अगदी चार-पाच हजार रुपयांपासून घागरा ओढणी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयीन तरुण-तरुणींकडून बॅ्रण्डेड जिन्स, ट्राऊजर सोबतच ट्रेंडी टी-शर्टला पसंती मिळत आहे.