संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज
By Admin | Updated: September 22, 2016 01:03 IST2016-09-22T01:03:25+5:302016-09-22T01:03:49+5:30
वायुसेना : मिग २९, सुखोई-३०चे काम सुरू

संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज
नाशिक : भारतीय वायुसेना देशासमोरील कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज असून, आपत्कालीन परिस्थितीत वायुदलाचा पाठीचा कणा असणाऱ्या नाशिकच्या ओझर येथील ११ बीआरडी (बेस रिपेअर डेपो)मध्ये लढाऊ विमानांचे नूतनीकरण व दुरुस्ती, विमानांना अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत मागणीच्या प्रमाणात पुरवठा करण्याची क्षमता या मदर डेपोमध्ये असल्याची माहिती ११ बीआरडीचे स्टेशन कमांडर ग्रुप कॅप्टन पी.के. आनंद यांनी बुधवारी दिली. जम्मू काश्मीरमधील उरी खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाक संबंधामंध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्र्श्वभूमीवर वायुसेनेच्या डेपोकडून मिळालेल्या या माहितीला महत्त्व प्राप्त झाले आहे. वायुसेनेच्या ८४ व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर ओझरमिग येथील ११ बीआरडी स्टेशनच्या नालंदा सभागृहात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आनंद यांनी वायुदलाने गेल्या ८३ वर्षांच्या कारकि र्दीत केलेल्या यशस्वी कामगिरीचा आढावा घेतला. याप्रसंगी वायुदलाचे ग्रुुप कॅप्टन एस. एस. कुमार, आर. के. मनशारमानी, जे. मॅथ्यू, प्रदीप राघव, जनसंपर्क अधिकारी एन. चतुर्वेदी, विंग कमांडर, वाय. त्रिपाठी, एन. एन. क्षीरसागर, अनिल गोयल, मिग अपग्रेड टीम लिडर विंग कमांडर राहुल देशपांडे आदि उपस्थित होते. यावेळी विंग कमांडर राहुल यादव यांनी मिग विमानांना अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखविले. दरम्यान, मिग विमानांच्या अपघातांविषयी बोलताना त्यांनी मिग विमानांचे तंत्रज्ञान रशियाचे असून त्यांच्या वातावरणानुसार या विमानांची रचना व निर्मिती झाली आहे. तर भारतात जम्मू काश्मीरपासून पूर्वोत्तर भारत आणि दक्षिण भारतातही या विमानांचा वापर होतो. या वेगवेगळ्या वातावरणामुळेही मिग २१ सारख्या विमानांना अपघात होत असले तरी या विमानांना अद्ययावत करण्याचे काम भारतात होत असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
प्रथम कृती वायुसेनेची
देशासमोरील संकटकालीन परिस्थितीत वायुसेनेला प्रथम कृती करावी लागत असल्याचे मत स्टेशन कमांडर पी.के. आनंद यांनी व्यक्त केले. यापूर्वी पाकिस्तानने १९६५ मध्ये जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय वायुसेनेने लष्करासोबत शत्रूची ठिकाणे उद्ध्वस्त केली. तसेच ७१ मध्ये पाकिस्तानची ९४ विमाने पाडण्यात भारतीय वायुसेनेला यश आले होते.