रामकुंडावर जाण्यासाठी भाविक आक्रमक
By Admin | Updated: August 29, 2015 22:56 IST2015-08-29T22:55:53+5:302015-08-29T22:56:32+5:30
जेलरोड येथील घटना : बॅरिकेड्स हटविण्याचा प्रयत्न, पोलिसांची धावपळ

रामकुंडावर जाण्यासाठी भाविक आक्रमक
नाशिकरोड : पंचवटी, तपोवनात जाऊ द्यावे, अशी विनंती करीत दसक घाटावर आलेल्या भाविकांनी रस्त्यावरील बॅरिकेड्स हटविण्याचा प्रयत्न केला. भाविकांची गर्दी वाढल्याने पोलिसांना त्यांना रोखून धरण्यासाठी चांगलीच धावपळ करावी लागली. नाशिकरोडकडून आलेल्या हजारो भाविकांना दसक घाटावर स्नानासाठी सोडण्यात आल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली.
पुणे रस्ता मार्गे व रेल्वे मार्गाने आलेल्या भाविकांना पहाटेपासूनच बिटको चौकातून जेलरोड दसक घाटावर स्नान करण्यास पाठविण्यात आले. भाविकांच्या गर्दीने दसक घाट फुलून गेला होता. दसक घाटावरील संत जनार्दन स्वामी पुलावर बॅरिकेड्स टाकून रस्ता बंद करण्यात आला होता. सकाळी ८ वाजेच्या सुमारास काही भाविक स्नान करून परतीच्या मार्गावर निघाले असता त्यांनी अचानक पुलावरील बॅरिकेड्स बाजूला करण्याचा प्रयत्न करून आम्हाला पंचवटी, तपोवनाच्या दिशेने जाऊ देण्याची मागणी करू लागले. पोलीस भाविकांना समजावून सांगत असताना जेलरोडमार्गे स्नान करण्यास येणारे भाविकदेखील बॅरिकेड्समधून घुसण्याचा प्रयत्न करू लागले. पोलिसांनी ताकदीचा वापर करून बॅरिकेड्स लावून धरत भाविकांना रोखून धरले.
दसक घाटावर बंदोबस्ताला असलेले पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तरीदेखील बॅरिकेड्समधून घुसून काही भाविक महिला खाली पडल्याने बाका प्रसंग निर्माण झाला होता. मात्र पोलीस अधिकारी धिवरे, झेंडे, न्याहळदे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भाविकांना शांत केले. काही भाविक बॅरिकेड्सच्या त्या बाजूला तर त्यांचे नातेवाईक या बाजूला अशी ताटातुट झाल्याने भाविक गोंधळ करू लागले. मात्र पोलिसांनी भाविकांना समजावून हळूहळू तपोवनकडे जाऊ दिल्याने निर्माण झालेला तणाव लागलीच निवळल्यामुळे सुदैवाने संघर्ष टळला. (प्रतिनिधी)