‘हाऊसफुल्ल’ प्रयोगाने नाटकांचा पुनश्च हरि ओम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 01:08 IST2021-01-18T01:07:22+5:302021-01-18T01:08:01+5:30
कोरोनाच्या धास्तीनंतर प्रथमच नाशिकच्या रंगभूमीवर पाऊल ठेवलेल्या महाराष्ट्राच्या दोन्ही लाडक्या नटांना नाशिकच्या रंगभूमीने मनमुराद दाद देत नाटकाचे प्रयोग हाऊसफुल्ल केले. विशेष म्हणजे दोन्ही नाटके रविवारच्या एकाच दिवशी असूनही नाशिककरांचा लाभलेला प्रतिसाद दोन्ही नटांसह सर्वच रंगकर्मींसाठी अत्यंत सुखद धक्का ठरला.

कालिदास कलामंदिर येथे तिकीट खिडकीवर अभिनेता प्रशांत दामले यांनी स्वत: आपल्या नाटकाची तिकीटविक्री केली.
नाशिक : कोरोनाच्या धास्तीनंतर प्रथमच नाशिकच्या रंगभूमीवर पाऊल ठेवलेल्या महाराष्ट्राच्या दोन्ही लाडक्या नटांना नाशिकच्या रंगभूमीने मनमुराद दाद देत नाटकाचे प्रयोग हाऊसफुल्ल केले. विशेष म्हणजे दोन्ही नाटके रविवारच्या एकाच दिवशी असूनही नाशिककरांचा लाभलेला प्रतिसाद दोन्ही नटांसह सर्वच रंगकर्मींसाठी अत्यंत सुखद धक्का ठरला.
मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून कोरोनामुळे ठप्प झालेल्या नाशिकच्या रंगभूमीला पुन्हा गतवैभव मिळण्यास तब्बल दहा महिन्यांचा कालावधी लागला आहे. नाशिकच्या रंगभूमीवर १७ तारीखला आपले नाटक येणार असल्याचे प्रशांत दामले यांनी फेसबुकसह विविध समाज माध्यमांव्दारे त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवले होते. त्यामुळे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच या नाटकाची निर्धारित संख्येच्या तुलनेत निम्मी तिकिटे विकली गेली होती. त्यानंतर शनिवारपासून तर अगदी मोजकीच तिकिटे शिल्लक राहिल्याचे कळल्यानंतर प्रशांत दामले यांनी स्वत: रविवारी सकाळी तिकीट काऊंटरवर बसून प्रेक्षकांना तिकीट विक्री केली. स्वत: प्रशांत दामले तिकीट खिडकीवर आहेत, असे समजताच प्रेक्षकांनीदेखील उर्वरित सर्व तिकिटे खरेदी करीत हाऊसफुल्लचा फलक झळकवला. कालिदासच्या नूतनीकरणानंतर देखील पहिला प्रयोग दामले यांच्याच नाटकाचा लागला होता तो प्रयोग तर हाऊसफुल्ल झाला होता.
नाट्यगृहाबाहेर रसिक प्रेक्षकांच्या रांगा
n रविवारी कालिदास कलामंदिरामध्ये सकाळ आणि सायंकाळ असे दोन प्रयोग लागले होते. या दोन्हीही नाटकांना रसिकांनी प्रतिसाद दिला. नाट्यगृहाबाहेर प्रेक्षकांच्या रांगा लागल्या होत्या. रसिकांचे थर्मल स्कॅनिंग करून नाट्यगृहात प्रवेश देण्यात आला.
n ‘भरत येतोय परत’ म्हटल्यावर त्याच्यावर नितांत प्रेम करणाऱ्या नाशिककरांनीदेखील दोन आठवडे आधीच निम्म्याहून अधिक तिकिटांची खरेदी केली होती. रविवारी सकाळीच भरत जाधवच्या नाटकाची सर्व तिकीट विक्री झाल्याने रविवारी दोन्ही प्रयोगांना हाऊसफुल्लचा फलक झळकल्याचे चित्र कालिदासमध्ये पहायला मिळाले.
n दोन्ही नाटकांना ऑनलाइन बुकिंगबरोबरच आगाऊ तिकीटविक्रीला प्रतिसाद दिला. शासन आदेशानुसार ५० टक्केच उपस्थिती असली तरी तेवढी उपस्थिती १०० टक्के लावली.