‘साद स्वरांची’ मैफलीत रसिक मुग्ध
By Admin | Updated: February 23, 2015 00:30 IST2015-02-23T00:27:47+5:302015-02-23T00:30:44+5:30
बालगणेश महोत्सव : हिंदी-मराठी गीत गायनाने जिंकली मने

‘साद स्वरांची’ मैफलीत रसिक मुग्ध
साद स्वरांची मैफलीत गीतगायन करताना वैशाली भैसणे-माडे, प्रेम भैसणे, अमोल पाळेकर. समवेत वाद्यवृंद.नाशिक : गणनायकाय गण दैवताय..., मनात ये ना, जवळ ये ना.., मन उधाण वाऱ्याचे.., मै तनु समजावा..., सून रहा है ना तू यासारख्या गीतांच्या सुमधूर गायनाची साद स्वरांची मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. दरम्यान, भक्तिगीते, भावगीतांच्या गायनाने बाल गणेश मंदिराच्या आवारात धार्मिक वातावरणाची निर्मिती झाली होती.
निमित्त होते, गंगापूररोडवरील पंडित कॉलनीमधील बालगणेश उद्यानात बालगणेश फाउण्डेशनच्या वतीने आयोजित साद स्वरांची या मैफलीचे! गायक वैशाली भैसणे-माडे, प्रेम भैसणे, अमोल पाळेकर यांच्या सुमधुर गीतगायनाने रसिकांना मुग्ध केले. गणनायकाय गणदेवताय..., या गणरायाच्या आराधनेने मैफलीला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर वैशाली हिने आपल्या सुरेल आवाजात होणार सून मी या घरची..., डिपाडी डिपांग.., येऊ कशी, कशी मी नांदायला..., कोंबडी पळाली यासारख्या मराठी गीतांना रसिकांची उत्स्फू र्त दाद मिळविली. तसेच दमा दम मस्त कलंदर ही गाजलेली कव्वाली वैशाली, प्रेम व अमोल यांनी आपल्या सुरेल आवाजात दमदारपणे सादर करत ‘वन्स मोर’ मिळविला. आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे..., मेरे मन ये बता दे तू..., ये जमी गा रही हैं..., या हिंदी गीतांबरोबरच ‘हात नका लाऊ माझ्या साडीला’ या लावणीने मैफलीची उंची गाठली. गायकांच्या सुरेल आवाजाला प्रभा मोसमकर (ढोलकी), अभिजीत शर्मा (आॅक्टोपॅड), प्रसाद भालेराव (तालवाद्य), नीलेश सोनवणे (गिटार), मनोज गुरव (बासरी), समीर शेख (की-बोर्ड) या वादकांनी सुरेख साथसंगत करत मैफल उत्तरोत्तर खुलविण्याचा प्रयत्न केला.
निवेदन अर्चना निपाणकर, श्रीपाद कोतवाल यांनी केले. मैफलीला परिसरातील श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गायक व वाद्यवृंदांचा नगरसेवक अजय बोरस्ते यांनी सत्कार केला. (प्रतिनिधी)