नाशिक महापालिकेवर धडकला राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचा ‘जवाब दो’ मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 14:39 IST2017-12-15T14:36:16+5:302017-12-15T14:39:06+5:30
समस्यांचा गुंता : सत्ताधारी भाजपाविरोधी घोषणाबाजी

नाशिक महापालिकेवर धडकला राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचा ‘जवाब दो’ मोर्चा
नाशिक - ‘वाह रे मोदी तेरा खेल, लूट गयी जनता विकास हुआ फेल’, ‘भाजपा के दिन आ गये अच्छे, जनता को जो खा गये कच्चे’ अशा घोषणा देत शहरातील विविध समस्या घेऊन शहर राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचा ‘जवाब दो’ मोर्चा शुक्रवारी (दि.१५) महापालिकेवर येऊन धडकला. राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी यावेळी, महापालिकेने समस्यांची सोडवणूक केली नाही तर आणखी उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी बोलताना दिला.
शहर राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्यावतीने आयोजित या मोर्चाला बी. डी. भालेकर मैदानापासून सुरुवात झाली. प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, रायुकॉँचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, प्रदेश सरचिटणीस नाना महाले, मनपातील गटनेते गजानन शेलार, अर्जुन टिळे, कविता कर्डक, बाळासाहेब कर्डक यांच्या नेतृत्वाखाली वाजतगाजत निघालेल्या या मोर्चात महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या कारभाराविरोधी घोषणा देण्यात आल्या. मोर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग होता. मोर्चेक-यांच्या हाती असलेले विविध समस्या दर्शविणारे घोषणा फलक लक्ष वेधून घेत होते. महापालिका राजीव गांधी भवनसमोर मोर्चा आल्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी, संग्राम कोते पाटील यांनी नाशिक शहर मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेऊनही अपेक्षित विकास होत नसल्याची टीका केली. गजानन शेलार यांनी शहर बससेवा महापालिकेने ताब्यात घेण्यास विरोध दर्शविला तसेच डेंग्यूच्या आजाराची लागण झालेल्या रुग्णांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी शहर बसच्या बंद करण्यात आलेल्या फे-या पुन्हा सुरू करण्याची मागणी केली तसेच एआर अंतर्गत पार्कींगप्रश्नी गांभीर्याने लक्ष घालण्याची सूचना केली. कविता कर्डक यांनी अंगणवाड्यांमधील सेविकांना आठ महिन्यांपासून पगार नसल्याचे निदर्शनास आणून दिले. अंबादास खैरे यांनी शहरातील विविध समस्या सोडविण्यात महापालिकेतील सत्ताधारी भाजपा अपयशी ठरल्याचे सांगितले. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांना विविध समस्यांचे निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक सुषमा पगारे, समीना मेमन, प्रेरणा बलकवडे, संजय खैरनार, महेश भामरे, अर्चना भामरे आदी उपस्थित होते.