रेशनच्या धान्याचा काळाबाजार उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 23:39 IST2019-05-25T23:39:30+5:302019-05-25T23:39:58+5:30
रेशनच्या धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत अनेक उपाययोजना व संगणकीय प्रणालीचा वापर केला जात असल्याचा दावा पुरवठा विभागाकडून केला जात असला तरी, अद्यापही रेशन दुकानदार धान्याचा काळाबाजार करीत असल्याचे उघड झाले आहे.

रेशनच्या धान्याचा काळाबाजार उघडकीस
पंचवटी : रेशनच्या धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत अनेक उपाययोजना व संगणकीय प्रणालीचा वापर केला जात असल्याचा दावा पुरवठा विभागाकडून केला जात असला तरी, अद्यापही रेशन दुकानदार धान्याचा काळाबाजार करीत असल्याचे उघड झाले आहे. पंचवटीत स्वस्त धान्य दुकानातून धान्याची काळ्याबाजारात विक्री करण्यासाठी वाहतूक करताना आढळून आल्याने पोलिसांनी स्वस्त धान्य दुकान चालकासह रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागाने शहरातील सर्व धान्य दुकानांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत गेल्या दोन वर्षांपासून धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी विविध प्रयत्न केले जात असल्याने धान्याचा काळाबाजार पूर्णत: रोखला गेला असा दावा केला जात असताना पंचवटीतील घटनेने दुकानदारांचे पितळ उघडे पडण्याबरोबरच पुरवठा खात्याचा अनागोंदी कारभारही चर्चेत आला आहे. शुक्रवारी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास पाथरवट लेन येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ३२ येथे स्वस्त धान्य दुकानचालक संशयित आरोपी दिनकर गोपाळराव पोटे, रिक्षाचालक मंगेश पांडुरंग उमंग असे दोघेजण स्वस्त धान्य दुकानातील दोन क्विंटल गहू व एक क्विंटल तांदूळ असे सहा हजार रुपयांचे धान्य काळाबाजारात विक्रीच्या उद्देशाने रिक्षातून घेऊन जात असताना त्याचदरम्यान पुरवठा निरीक्षक रोहिदास अंबादास भालसिंग हे त्या भागातून जात होते. त्यांनी सदरचा प्रकार पाहिल्यावर तत्काळ पोलिसांना याची खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी दुकानदार व रिक्षाचालक अशा दोघांना ताब्यात घेऊन सहा हजार रुपये किमतीचे तीन क्विंटल गहू व तांदूळ जप्त केले. या प्रकरणी पुरवठा निरीक्षकाने दिलेल्या तक्रारीवरून जीवनावश्यक वस्तू कायदा कलमान्वये पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
रेशनच्या धान्याच्या काळाबाजाराची घटना उघडकीस येताच, पुरवठा विभागाने शहरातील सर्व दुकानांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुकानदार दिनकर पोटे यांच्या दुकानातील कागदपत्रे, दप्तर ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली जात आहे. ई पॉस प्रणालीने किती धान्य वाटप होते व मॅन्युएली किती धान्य वाटप होते याची माहिती गोळा करण्यात येत आहे.