पंचवटी प्रभाग सभापतिपदी मनसेचे रुची कुंभारकर बिनविरोध

By Admin | Updated: April 14, 2016 00:13 IST2016-04-14T00:07:43+5:302016-04-14T00:13:21+5:30

निवड : आमदार सानपांसह भाजपाच्या खोडे गैरहजर

Ranchi Divisional Commissioner | पंचवटी प्रभाग सभापतिपदी मनसेचे रुची कुंभारकर बिनविरोध

पंचवटी प्रभाग सभापतिपदी मनसेचे रुची कुंभारकर बिनविरोध

 पंचवटी : पंचवटी प्रभाग समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपा, अपक्ष व कॉँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने नगरसेवक रुची कुंभारकर यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दरम्यान पंचवार्षिक निवडणुकीच्या शेवटच्या वर्षात काहीतरी नाट्यमय घडामोडी घडतील अशी शक्यता वर्तविली जात होती; मात्र कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, मनसे व अपक्ष यांनी महाआघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचे एकमत केल्याने विरोधकांना कोणतीही राजकीय खेळी करता आली नाही.
पंचवटी विभागीय कार्यालयात दुपारी साडेबारा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. प्रभाग सभापतीसाठी मनसेकडून कुंभारकर, भाजपाकडून प्रा. परशराम वाघेरे, अपक्ष दामोदर मानकर, तर कॉँग्रेसकडून विमल पाटील यांनी अर्ज सादर केले होते. अर्ज माघारीच्या वेळेपूर्वीच वाघेरे व मानकर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे माघारी अर्ज दिले; मात्र दिलेल्या वेळेत अर्ज माघारी घेतले जातील असे सुचविल्याने वेळ सुरू होताच तिघाही उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. सभापतिपदासाठी कुंभारकर यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कुंभारकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
यावेळी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरमित बग्गा, अ‍ॅड. राहुल ढिकले, उद्धव निमसे, गणेश चव्हाण, डॉ. विशाल घोलप, समाधान जाधव, सुनीता निमसे, मीना माळोदे, कविता कर्डक, रूपाली गावंड, सुनीता शिंदे, लता टिळे, ज्योती गांगुर्डे, फुलावती बोडके, रंजना भानसी, शालिनी पवार हे सदस्य उपस्थित होते. शिवसेनेच्या मनीषा हेकरे यांनी सभागृहात हजेरी लावली; मात्र काही वेळातच त्यांनी सभागृहाबाहेर काढता पाय घेतला. तर भाजपा आमदार बाळासाहेब सानप व सिंधू खोडे हे दोघेही गैरहजर होते.
भाजपा तसेच शिवसेना यांनी महाआघाडी विरोधात लढा देण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी वाघेरे तसेच अपक्ष मानकर यांच्या माध्यमातून उमेदवारदेखील उभे केले; मात्र संख्याबळ कमी असल्याने सेना भाजपाचे मनसुबे उधळले गेले. सभापतिपदी कुंभारकर यांची निवड होताच उपस्थित सदस्यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. (वार्ताहर)

Web Title: Ranchi Divisional Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.