पीडित महिलांसाठी लढणारी रणरागिणी
By Admin | Updated: October 18, 2015 23:50 IST2015-10-18T23:50:13+5:302015-10-18T23:50:43+5:30
पीडित महिलांसाठी लढणारी रणरागिणी

पीडित महिलांसाठी लढणारी रणरागिणी
असंवेदनशील बनलेल्या समाजात स्त्रीला न्याय आणि तिच्या हक्काचे रक्षण होईल का? या प्रश्नाचे उत्तर कदाचित नकारात्मकच येईल. स्त्रीहक्क आणि कायद्याच्या बाबतीत कितीही गप्पा मारल्या तरी स्त्री व बालिकांवरील अत्याचार आणि जातीव्यवस्थेची धग सोसलेल्या महिलांच्या प्रकरणात किती दोषींवर कारवाई झाली? यावरून या पीडित महिला किती एकाकी आहेत याची विदारक कल्पना येते. अशा महिलांच्या न्याय हक्कासाठी सिडकोतील विमल पोरजे या महिला कार्यकर्त्या गेल्या बारा वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. जिवाची पर्वा न करता त्यांनी बलात्कारी आणि बळी गेलेल्या महिलांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्या या कार्यात त्यांना अडचणी येऊनही त्यांनी संघर्षाची मशाला तेवत ठेवली आहे. मोलकरीण, कामगार महिलांसाठीदेखील त्यांची ‘झुंज’ सुरूच असते. लढा शासकीय दरबारी असो वा पीडित महिलेच्या कुटुंबीयांशी पोरजे यांनी महिलांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे. सिडकोतील एका महिलेच्या हत्त्येप्रकरणी पोरजे यांना तर सलग दहा दिवस धमक्यांना सामोरे जावे लागले होेते; परंतु धमक्यांना न घाबरताही त्यांनी प्रकरण तडीस नेले. अगोदर बेपत्ता म्हणून नोंद झालेल्या महिलेचा नंतर खून झाल्याची बाब उघड झाली होती. या प्रकरणात त्यांचा संघर्ष मोलाचा ठरला. अन्य एका प्रकरणात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी महिलेवरील बलात्कार प्रकरणी त्यांनी पीडित महिलेस न्याय मिळवून दिला आहे. पोलिसांनी अगोदर केवळ छेडछाड म्हणून गुन्हा दाखल केला होता. पोरजे यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे बलात्काराचा गुन्हा झाला आणि या आदिवासी महिलेची केस कोर्टात उभी राहिली. यासाठी त्यांना सलग चार दिवस संघर्षाची भूमिका घ्यावी लागली. याबरोबरच मोलकरणींसाठी धाऊन जाणाऱ्या पोरजे यांनी शासनाच्या ‘सन्मानधन’ योजनेतून महिलांना दहा हजारांचा निधी मिळवून दिलेला आहे. महिलांच्या अनेक समस्या असतात. विशेषत: अशिक्षित, अल्पशिक्षित, गोरगरीब, मोलमजुरी करणाऱ्या महिलांच्या वाट्याला अनेक दु:खे येतात. त्यांना ना समाजाचे सहकार्य मिळते ना शासनाची मदत. या महिलांची ही घुसमट ओळखून विमल पोरजे यांनी सुरू केलेला लढा अधिक व्यापक केला आहे. भारतीय महिला फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला असून, आता पीडित महिलांसाठी त्यांनी ‘झुंज’ ही कामगार संघटनादेखील स्थापन केलेली आहे.