रामकुंड फुल्ल
By Admin | Updated: August 28, 2015 23:12 IST2015-08-28T23:09:56+5:302015-08-28T23:12:37+5:30
स्नानासाठी गर्दी : पालकमंत्र्यांकडून पाहणी

रामकुंड फुल्ल
नाशिक : कुंभमेळ्याच्या प्रथम पर्वणीआधीच भाविकांनी रामकुंडावर स्नानासाठी गर्दी केल्याने पर्वणीच्या पूर्वसंध्येलाच अवघा गोदाघाट फुलून गेला होता. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी सायंकाळी रामकुंड परिसराचा दौरा करून व्यवस्थेची पाहणी केली.
शनिवारी (दि. २९) कुंभमेळ्याची प्रथम पर्वणी असून, दुपारी २ वाजेपर्यंत भाविकांना रामकुंडावर प्रवेश दिला जाणार नसल्याचे पोलिसांनी घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांनी शुक्रवारी दिवसभर रामकुंडावर प्रचंड गर्दी केली होती. रामकुंडासह अनेक घाटांवर स्नानाची पर्वणी साधली जात होती. बारा वर्षांनी उघडणाऱ्या गंगा-गोदावरी मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी दूरपर्यंत रांग लावली होती. परिसरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. टॉवरवरून परिसराची टेहळणी केली जात होती. रामकुंडाकडे जाणारे रस्ते दुपारनंतर बॅरिकेड्सद्वारे वाहनांसाठी बंद करण्यात आले होते. जीवरक्षक दल व महापालिकेच्या तरणतलाव विभागाचे कर्मचारी ठिकठिकाणी तैनात होते. काही भाविकांनी परिसरातच ठिय्या मांडला होता.
दरम्यान, सायंकाळी पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, आमदार बाळासाहेब सानप, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासह अधिकाऱ्यांनी रामकुंडाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. (प्रतिनिधी)