रामघाटावर ‘घडलंय’; महासभेत ‘बिघडलंय’

By Admin | Updated: July 18, 2015 00:08 IST2015-07-18T00:07:44+5:302015-07-18T00:08:15+5:30

मानापमान नाट्य : भाजपासह पोलिस यंत्रणा व पुरोहित संघावर शरसंधान

Ramghat has 'happened'; 'Bad' in the General Assembly | रामघाटावर ‘घडलंय’; महासभेत ‘बिघडलंय’

रामघाटावर ‘घडलंय’; महासभेत ‘बिघडलंय’

नाशिक : सिंहस्थ कुंभपर्वाच्या शुभारंभाला मंगळवारी (दि.१४) ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी रामघाटावर महापौरांसह पदाधिकारी व नगरसेवकांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीचे रामायण घडल्यानंतर शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या महासभेत सदस्यांचा नूर बिघडला आणि भाजपासह पोलीस यंत्रणा व पुरोहित संघावर सारेच तुटून पडले. मानापमान नाट्यावर सुमारे चार तास चर्चा झडल्यानंतर येत्या १९ आॅगस्ट रोजी साधुग्राममध्ये आखाड्यांचा होणारा ध्वजारोहण सोहळा महापालिकेमार्फत दिमाखात साजरा करण्याचा आणि त्याठिकाणी सर्वांना सन्मानाने निमंत्रित करण्याचा निर्णय महापौरांनी घोषित केला.
पुरोहित संघामार्फत आयोजित धर्मध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमस्थळी अनेक नगरसेवकांना पोलिसांनी मज्जाव करत त्यांना अपमानास्पद वागणूक मिळण्याचा प्रकार घडला होता. या साऱ्या प्रकाराबाबत मनसेचे नगरसेवक सुदाम कोंबडे यांनी महासभेत लक्षवेधी मांडत पुरोहित संघावर आणि पोलिस यंत्रणेवर जोरदार प्रहार केले. पुरोहित संघाच्या ताब्यात असलेले महापालिकेचे वस्त्रांतरगृह काढून घेण्याची मागणीही कोंबडे यांनी केली. त्यानंतर भाजपावगळता सर्वपक्षीय सदस्यांनी पुरोहित संघासह पोलीस यंत्रणा आणि भाजपावरही तोंडसुख घेतले. विलास शिंदे यांनी पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध नोंदविला. संदीप लेनकर यांनी भाजपावर हल्ला चढवत सिंहस्थ निधीतही दुजाभाव झाल्याचा आरोप केला. तानाजी जायभावे यांनी त्र्यंबकेश्वरला सन्मानपूर्वक सोहळा होत असताना नाशिकला महापौरांसह पदाधिकारी व नगरसेवकांना मिळालेल्या वाईट वागणुकीचा निषेध केला. शिवाजी गांगुर्डे यांनी अशा ठिकाणी आपण जाणे टाळावे असा सल्ला देत पोलिसांच्या मुजोरीवर प्रहार केले. रंजना बोराडे, योगिता अहेर, राहुल दिवे, शाहू खैरे, प्रकाश लोंढे, सूर्यकांत लवटे, शिवाजी शहाणे, डी. जी. सूर्यवंशी, ललिता भालेराव, लक्ष्मण जायभावे, शोभा आवारे, रत्नमाला राणे, सुवर्णा मटाले, यशवंत निकुळे, सुधाकर बडगुजर, मनसे गटनेते अनिल मटाले, विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, सभागृहनेते सलीम शेख या साऱ्यांनीच झालेली घटना निंदनीय असल्याचे सांगत निषेध नोंदविला आणि सिंंहस्थ पर्वणीकाळात पदाधिकारी व नगरसेवकांचा सन्मान राखला जाण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सदर ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन महापालिकेनेच करणे आवश्यक होते. पदाधिकारी व नगरसेवकांना कार्यक्रमस्थळी उपस्थित राहण्याबाबत महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने, प्रशासनाने दक्षता घेण्याची आवश्यकता होती. मुख्य सोहळ्यात महापौरांना बोलू दिले नाही. नगरसेवकांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. अनेक नगरसेवकांना निमंत्रणच मिळाले नाही. सिंहस्थ कामांसाठी नगरसेवकांनी गेल्या तीन वर्षांपासून आपल्या प्रभागातील निधीवर पाणी सोडले असताना नगरसेवकांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याबद्दल सदस्यांनी तिखट शब्दांत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. सुमारे चार तास चाललेल्या चर्चेनंतर महापौर अशोक मुर्तडक यांनी झाले ते चुकीचे व निंदनीय असल्याचे सांगत झाले गेले विसरून जाण्याचे आवाहन सदस्यांना केले. येत्या १९ आॅगस्टला साधुग्राममध्ये आखाड्यांचा ध्वजारोहण सोहळा होणार असून तो महापालिकेमार्फत केला जाईल. पर्वणीकाळात नगरसेवकांना ग्रीन पास देण्यासाठी पोलिस आयुक्तांशी चर्चा झाली असून त्यांनी त्यास मान्यता दिली असल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Ramghat has 'happened'; 'Bad' in the General Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.