रामेश्वर ग्रामपंचायतीची झाली स्मार्ट ग्रामपुरस्कारासाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 15:43 IST2021-07-11T15:41:06+5:302021-07-11T15:43:46+5:30

खर्डे ; रामेश्वर ता. देवळा ग्रामपंचायतीची स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी निवड झाली आहे. शासनाकडून या ग्रामपंचायतीला १० लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.

Rameshwar Gram Panchayat selected for Jhalismart Gram Award | रामेश्वर ग्रामपंचायतीची झाली स्मार्ट ग्रामपुरस्कारासाठी निवड

रामेश्वर ग्रामपंचायतीची झाली स्मार्ट ग्रामपुरस्कारासाठी निवड

ठळक मुद्देमहाराष्ट्र शासनाकडून मिळणार १० लाखाचे बक्षिस

खर्डे ; रामेश्वर ता. देवळा ग्रामपंचायतीची स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी निवड झाली आहे. शासनाकडून या ग्रामपंचायतीला १० लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्याकरीता ग्रामोथ्थान अभियान सुरु करण्यात आलेले आहे. भौतिक, सामाजिक व उत्पन्न साधने या तीन क्षेत्रात शासनाच्या आर्थिक तांत्रिक व प्रशासकिय सहकार्याने, लोकांच्या पुढाकाराने हा विकास अपेक्षित होणार आहे. यापैकी दर्जेदार भौतिक मुलभूत सुविधा साठीचा हा कार्यक्रम आहे.
शाश्वत ग्रामविकास संकल्पनेत महत्त्वाचे तत्त्व असे आहे की, गावात एकीकडे उच्च प्रतिच्या भौतिक सुविधांची निर्मिती करतानाच यासाठी लागणाऱ्या नैसर्गिक साधन संपत्तीचा विनियोग पर्यावरणाचा समतोल राखून कसा करता येईल याचाही प्रामुख्याने विचार झाला पाहिजे.

दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होत आहे. पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करुन समृध्द व संपन्न गांवाची निर्मिती करणे ही काळाची गरज आहे . म्हणून शासनाने पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना सन २०१०-११ मध्ये सुरु केली. पर्यावरणीय संतुलन राखून गावाचा शाश्वत विकास हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी पिंपळगांव, मटाने व रामेश्वर या तीन ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. शासनाच्या २१ नोव्हेंबर २०१६ मधील परिशिष्ट "अ " मधील निकषानुसार स्वच्छता ,आरोग्य, सौर ऊर्जा, अटल पेन्शन योजना, पाणी गुणवत्ता, सुकन्या समृद्धी योजना, भूमिगत गटारी, गावात एकही गुन्हा नोंद नसल्याबाबत, बायोगॅस, पथदिवे आदी कामांची समितीने केलेल्या पहाणी अहवालात रामेश्वर ग्रामपंचायत शासनाच्या निकषात बसल्याने सन २०१९ /२० मधील तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी रामेश्वर गावाची निवड करण्यात आली आहे.
यासाठी गावाला शासनाकडून १० लाखांचे बक्षीस मिळणार आहे. गावांत स्वच्छतासह विविध विकास कामे करतांना नागरिकांचे सहकार्य मिळाल्यानेच गावाची विकासाकडे वाटचाल सुरू आहे. यामुळे गावाची स्मार्ट ग्राम ग्रामपंचायत म्हणून निवड झाली असून,यापुढेही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन कामकाज केले जाईल, अशी माहिती उपसरपंच विजय पगार यांनी दिली. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेविका आदी उपस्थित होते.

Web Title: Rameshwar Gram Panchayat selected for Jhalismart Gram Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.