राज यांचे प्रथम नमन वारकऱ्यांना
By Admin | Updated: September 2, 2015 23:47 IST2015-09-02T23:46:50+5:302015-09-02T23:47:57+5:30
साधुग्रामला भेट : मराठी बाण्याचे ‘असेही’ दर्शन; महंतांशी चर्चा

राज यांचे प्रथम नमन वारकऱ्यांना
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त तपोवनात उभारण्यात आलेल्या साधुग्रामला मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीचा कार्यक्रम ठरतो आणि राज यांचे वाहन थेट औरंगाबादरोडवरील वारकऱ्यांच्या खालशांमध्ये प्रवेश करते. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या आणि भागवत धर्माची पताका उंचावणाऱ्या वारकरी संप्रदायांच्या खालशांमध्ये महामंडलेश्वरांकडून त्यांचे यथोचित स्वागत होते आणि महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे व अस्मितेचे दर्शन एकाच ठिकाणी घडल्याचा आनंद व्यक्त करत राज यांचे वाहन नंतर निर्वाणी आखाड्याकडे मार्गस्थ होते. म्हणायला भेटीचा कार्यक्रम छोटासा परंतु राज यांनी सर्वप्रथम वारकरी संप्रदायाच्या खालशाला भेट देत आपला मराठी बाणा दाखवून दिल्याची चर्चा नंतर वारकऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्येही रंगली.
मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे सपत्नीक तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले आहेत. गुरुवारी सकाळी राज व शर्मिला ठाकरे यांनी साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ मानल्या जाणाऱ्या वणी येथील गडावरील सप्तशृंगी देवीचे दर्शन घेत महापूजा केली. नाशिकला परतत असतानाच राज यांचा तपोवनातील साधुग्राममध्ये भेट देण्याचा कार्यक्रम ठरतो आणि प्रमुख तीन आखाड्यांअगोदर राज यांचे वाहन थेट वारकरी संप्रदायाच्या खालशांमध्ये धडक मारते.
अचानक समोर आलेल्या राज ठाकरेंना पाहून वारकरी खालशांमधील महामंडलेश्वरांच्याही चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहतो. राज यांचे महंत रामकृष्णदास लहवितकर महाराज यांच्या हस्ते फेटा बांधून स्वागत केले जाते. यावेळी राज यांच्याकडून मोजक्या शब्दांत महाराष्ट्राची अस्मिता जपणाऱ्या आणि परंपरा पुढे नेणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या गौरवशाली परंपरेचे कौतुक केले जाते.
यावेळी वारकरी संप्रदायाच्या खालशांचे अमृतदास महाराज, अॅड. काशिनाथदास महाराज, ईश्वरदास महाराज, अनंतराव महाराज यांचेसह मुंबईहून आलेले संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर, महिला आघाडीच्या रिटा गुप्ता, हर्षल देशपांडे, सचिन मोरे, विनय येडेकर, महापौर अशोक मुर्तडक, प्रदेश पदाधिकारी डॉ. प्रदीप पवार, सभागृहनेते सलीम शेख, गटनेते अनिल मटाले, शहराध्यक्ष राहुल ढिकले, जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे, नगरसेवक शशिकांत जाधव, यशवंत निकुळे, संदीप लेनकर आदि उपस्थित होते. दहा मिनिटे वारकरी संप्रदायात थांबल्यानंतर राज यांनी साधुग्राममधील निर्वाणी आखाड्यात जाऊन महंत धरमदास यांची भेट घेतली.
यावेळी महंत धरमदास यांनी महापालिकेकडून विशेषत: महापौरांकडून चांगल्या प्रकारे व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर राज यांच्या वाहनांचा ताफा हॉटेल एक्सप्रेस इनकडे रवाना झाला. (प्रतिनिधी)
४कार्यकर्त्यांमध्ये रंगली चर्चासिंहस्थ कुंभमेळ्यातील पुरोहित संघ आणि प्रमुख आखाड्यांच्या धर्मध्वजारोहण सोहळ्याला राज यांची अनुपस्थिती जाणवली होती. पुरोहित संघाने राज यांना निमंत्रणच दिले नसल्याचा आरोप मनसेकडून केला जात होता तर राज यांची भेटच होत नसल्याचे कारण पुरोहित संघाकडून दिले जात होते. त्यामुळे पुरोहित संघाच्या ध्वजारोहण सोहळ्याकडे राज यांनी पाठ फिरविली होती. त्यानंतर १९ आॅगस्टला झालेला आखाड्यांचा ध्वजारोहण सोहळा तर महापालिकेनेच आयोजित केलेला असतानाही राज यांनी न येणेच पसंत केले होते. आता नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज यांनी पहिल्यांदा साधुग्रामला भेट देण्याचे ठरविले आणि ते सुद्धा पहिल्यांदा वारकरी संप्रदायाच्या खालशाची निवड केल्याने राज यांच्या महाराष्ट्रीयन व मराठी बाण्याची चर्चा सुरू झाली. प्रमुख तीनही आखाडे हे उत्तर भारतीय असल्याने राज यांनी सर्वप्रथम महाराष्ट्राची अस्मिता जपणाऱ्या वारकऱ्यांना भेट दिली आणि येथेही परप्रांतीय विरुद्ध महाराष्ट्रीयन अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली.