राजस्थानी हॅकरला कोठडी

By Admin | Updated: July 4, 2017 01:06 IST2017-07-04T01:05:53+5:302017-07-04T01:06:10+5:30

बाडमेर येथे अटक : आयपी अ‍ॅड्रेसच्या माध्यमातून घेतला शोध; गुंगारा देताना सापडला जाळ्यात

Rajasthani hacker closet | राजस्थानी हॅकरला कोठडी

राजस्थानी हॅकरला कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर्स, उद्योजक त्यातही प्रामुख्याने महिलांचे सोशल मीडियावरील व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करून त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील व्यक्तींना अश्लील संदेश, अश्लील बोलणारा दीप्तेश प्रकाशचंद्र सालेचा (२५, रा़ जसोलगाव, तहसील पचपदरा, जि़ बाडमेर, राजस्थान) या युवकास सायबर पोलिसांच्या पथकाने अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली़ या युवकास न्यायालयात हजर केले असता मुख्य न्यायदंडाधिकारी एस़ टी़ डोके यांनी ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़
शहरातील डॉ़ गौरी प्रिंप्राळेकर, डॉ़ मनीषा रौंदळ, नीलेश मते यांसह शहरातील ३१ प्रतिष्ठितांचे त्यातही प्रामुख्याने २९ महिलांचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करून त्याद्वारे परिचितांना अश्लील संदेश पाठविले जात होते़ हा प्रकार लक्षात आल्यानंतर २८ जूनला हॅकिंगचा फटका बसलेल्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिल्यानंतर माहिती तंत्रज्ञान अधिनियम (आयटी) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला़ या हॅकर्सचा शोध घेण्याची जबाबदारी सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्याकडे सोपविण्यात आली होती़
सायबर पोलिसांनी तक्रारदार व साक्षीदार यांच्यामध्ये झालेल्या अश्लील चॅटिंगचा आयपी अ‍ॅड्रेस घेऊन हॅकरचा शोध घेतला असता तो राजस्थानमधील असल्याचे समोर आले़ त्यानुसार सायबर शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक देसले, पोलीस शिपाई अजबे, बागडे, रुमाले यांचे एक पथक हॅकर्सच्या शोधासाठी राजस्थानला पाठविण्यात आले होते़ या पथकास नाशिकच्या तांत्रिक विश्लेषक शाखेकडून हॅकरची माहिती दिली जात होती, मात्र तो वारंवार ठिकाण बदलत होता़सायबर इश्यू सेस्नेटीव्ह
ओळखीचा असो वा अनोळखी व्यक्तीने व्हॉट््सअ‍ॅपवर चॅटिंग करून ओ़टी़पी.ची मागणी केल्यास ओ़टी़पी़ देऊ नये़ तसेच व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट टू स्टेप व्हेरिफिकेशन करून सुरक्षित करावे़ तसेच यावर येणाऱ्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नये़ सायबर गुन्ह्याच्या तक्रारीसंदर्भात पोलिसांशी संपर्क साधावा़
- डॉ़ रवींद्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिकव्हॉट्सअप ‘मास’मध्ये पहिल्यांदाच हॅक
हॅकर दीप्तेश सालेचा या युवकाने फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, जी-मेल हॅक केले़ गत पंधरा दिवसांपासून हा उद्योग त्याने सुरू केला़ स्वत:च्या विकृत आनंदासाठी त्याने हा उद्योग केल्याचे तपासात समोर आले असून, कोणाचीही आर्थिक फसवणूक झालेली नाही़ यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅप केवळ व्यक्तिगतरीत्या हॅक केले जात होते, मात्र शहरात पहिल्यांदा ते ‘मास’मध्ये हॅक झाले आहे़
- अनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणेहॅकिंगसाठी अशा मिळविल्या टिप्स़़़वाणिज्य शाखेच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या संशयित दीप्तेश सालेच्या याने इंटरनेटवरील यू-ट्यूब व ‘हाऊ टू हॅक’ यांसारख्या वेगवेगळ्या साइटस्वरून हॅकिंगच्या टिप्स मिळविल्या़ आपल्या लहान भावाच्या दुकानात असलेल्या वायफायचा वापर करून त्याने सर्वप्रथम बनावट फेसबुक अकाउंट तयार केले़ या अकाउंटवरून त्याने त्याच्यासारख्याच विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तींचा शोध घेतला़ त्यानंतर त्याने व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करून महिलांना अश्लील मॅसेज करणे, चॅटिंग करणे हे उद्योग सुरू केले़

Web Title: Rajasthani hacker closet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.