बारावी उत्तीर्णांवर कौतुकाचा वर्षाव
By Admin | Updated: June 1, 2017 00:55 IST2017-06-01T00:55:38+5:302017-06-01T00:55:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांवर जिल्ह्यात कौतुकाची थाप पडत असून, त्यांचे ठिकठिकाणी अभिनंदन केले जात आहे

बारावी उत्तीर्णांवर कौतुकाचा वर्षाव
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांवर जिल्ह्यात कौतुकाची थाप पडत असून, त्यांचे ठिकठिकाणी अभिनंदन केले जात आहे. विविध शाळा, महाविद्यालये तसेच संस्थांतर्फे यशस्वीतांचा सत्कार केला जात आहे.
सिन्नर : येथील सिन्नर महाविद्यालयाची विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु. साक्षी गिरीश गुजराथी हिने ५९३ गुण (९१.२३ टक्के) गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला.
जिद्द व चिकाटीच्या जोरावर साक्षी हिने हे यश संपादन केले आहे. सिन्नर महाविद्यालयातील प्राध्यापक गिरीश गुजराथी यांची ती कन्या आहे. तिच्या यशाबद्दल प्राचार्य डॉ. जे.डी. सोनखासकर यांनी साक्षी व तिच्या पालकांचा सत्कार केला. साक्षी हिच्या यशाबद्दल मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, मविप्रचे संचालक कृष्णाजी भगत, सिन्नर महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.
दरम्यान, सिन्नर महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ८२.७५ टक्के, वाणिज्य विभागाचा निकाल ९६.३८ टक्के, कला शाखेचा निकाल ५० टक्के तर किमान कौशल्य विभागाचा ७०.७० टक्के निकाल लागला. सिन्नर महाविद्यालयाचा सरासरी निकाल ७५ टक्के लागला. यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. जे. डी. सोनखासकर, विज्ञान विभागप्रमुख सी.जे. बर्वे, वाणिज्य विभागप्रमुख एस.व्ही. घुमरे, कला विभागप्रमुख एम.आर. अहिरे, किमान कौशल्य विभागप्रमुख के. एन. निंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभले.
सटाणा : वडिलांचे शिक्षण फक्त सहावी, तर आई फक्त सातवी नापास... घरची परिस्थिती अत्यंत जेमतेम... विहिरीने तळ गाठल्याने चार एकर शेती कोरड.. आपण शिकलो नाही म्हणून आपल्या मुलांनी शिकावे, मुलांना समाजात मानाचे स्थान मिळावे आणि सरकारी नोकरी मिळावी, अशी अपेक्षा उराशी बाळगून त्यांनी आपल्या लेकीच्या शिक्षणासाठी वाट्टेल ते केले. आणि मुलीनेही आईबापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने अभ्यास केला आणि बारावी सायन्सला सटाणा महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला. तिचे यश इथेच थांबलं नाही तर आजवर बागलाण तालुक्याच्या इतिहासात बारावी विज्ञान शाखेत सर्वाधिक ९१.२३ टक्के गुण मिळवून विक्र म केला.
सटाणा महाविद्यालयाचा आज बारावी सायन्सचा निकाल जाहीर झाला. प्रथम क्र मांक कोणाचा येणार म्हणून सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली असताना धनश्री जिभाऊ अहिरे या सहावी पास अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलीने प्रथम क्रमांक पटकाविला. धनश्री हिने मिळविलेले यश हजारो विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे असून, स्कूटी घेऊन हवेच्या वेगाने पळणाऱ्या विद्यार्थ्यांना ही मोठी चपराक आहे.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पाटणे येथील विद्यालयात झालेल्या धनश्रीला दहावीलादेखील ९४.२० टक्के गुण मिळाले होते.