गणेश चौकात साचते पावसाचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:09 IST2018-06-25T00:09:01+5:302018-06-25T00:09:19+5:30
दरवर्षी पावसाळ्यात सिडकोतील नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचे प्रकार घडत असून, यात काही प्रमाणात यंदाच्या वर्षी फरक पडला असला, तरी गणेश चौक भागातील मुख्य रस्त्यावर मात्र मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे.

गणेश चौकात साचते पावसाचे पाणी
सिडको : दरवर्षी पावसाळ्यात सिडकोतील नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचे प्रकार घडत असून, यात काही प्रमाणात यंदाच्या वर्षी फरक पडला असला, तरी गणेश चौक भागातील मुख्य रस्त्यावर मात्र मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. याबाबत स्थानिक नागरिक व नगरसेवकांनी पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासनाला जाग येत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सिडकोतील गणेश चौक भागातील मुख्य रस्त्यावर दरवर्षी पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांना यातून मार्ग काढणे कठीण होत आहे. यंदाच्या वर्षीदेखील पहिल्याच पावसाचे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दुकानांच्या समोर पाण्याचे तळे झाले होते. याच ठिकाणी दररोज पहाटेच्या सुमारास वृत्तपत्र विक्रेते वृत्तपत्र घेण्यासाठी येत असतात. सिडको वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष दत्ता ठाकरे व सर्व पदाधिकाऱ्यांनीदेखील याबाबत पाठपुरावा केलेला असतानाही मनपा प्रशासनाला जाग येत नाही. परिसरातील दुकानदार व नागरिकांनी नगरसेवक छाया देवांग यांना निवेदन दिले असून, रस्त्यावर साचणाºया पाण्याचा निचरा व्हावा यासाठी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. गणेश चौकातील याच मुख्य रस्त्यावर दररोज शाळकरी मुलांची तसेच कामगारांची वर्दळ असते. रस्त्यावर पावसाचे पाणी साचत असल्याने यातून मार्ग काढणे कठीण होत असून, अनेकदा या पाण्यात वाहने अडकून अपघातही झाले आहेत. याबरोबरच उपेंद्रनगर, बाजीप्रभू चौक, तानाजी चौक, महाजननगर येथील गजानन महाराज मंदिर आदी भागातही पावसाचे पाणी साचत असते. महापालिकेने आता ज्या भागात पावसाचे पाणी साचते त्याठिकाणी पाणी जाण्यासाठी मार्ग करणे गरजेचे आहे.