नांदूरशिंगोटे परिसरात दिवसभर पावसाची रिपरिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:29 IST2021-09-02T04:29:42+5:302021-09-02T04:29:42+5:30

सोमवारपासून पूर्वा नक्षत्र सुरू झाले असून हलक्या स्वरूपात पावसाने हजेरी लावली आहे. दोन दिवसापासून पाऊस सुरू असल्याने नागरिकांना सूर्यदर्शन ...

Rains throughout the day in Nandurshingote area | नांदूरशिंगोटे परिसरात दिवसभर पावसाची रिपरिप

नांदूरशिंगोटे परिसरात दिवसभर पावसाची रिपरिप

सोमवारपासून पूर्वा नक्षत्र सुरू झाले असून हलक्या स्वरूपात पावसाने हजेरी लावली आहे. दोन दिवसापासून पाऊस सुरू असल्याने नागरिकांना सूर्यदर्शन झाले नाही. यावर्षी सुरुवातीपासूनच परिसरात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिके कशीबशी तग धरून आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाची सरासरी कमी आहे. सर्वच नक्षत्रात कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली असली तरी परिसरातील पाझर तलाव, बंधारे, केटीवेअर कोरडेठाक असून, विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांना पिके वाचविण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

यावर्षी भाजीपाला पिकांना भाव मिळत नसल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. तसेच गेल्या काही दिवसापासून पावसाने दडी मारली होती, मात्र दोन दिवसापासून पावसाची रिपरिप सुरू असलेल्या थोड्या फार प्रमाणात शेती कामे ठप्प असून शेतमजुरांना सुटी मिळाली आहे.

मंगळवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारच्या सत्रात मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावल्याने रस्त्यावरून पाणी वाहत होते. बसस्थानकाच्या आवारात पावसाचे पाणी खड्ड्यात साचले होते, तर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले होते. रस्त्याच्या कडेला छोटे छोटे पाण्याचे तळे साचले होते.

चौकट...

लसीकरण केंद्रावर गर्दी

नांदूरशिंगोटे येथे दोन दिवसापासून पावसाने हजेरी लावल्याने बऱ्यापैकी शेतीकामे ठप्प होती. तसेच येथे मंगळवारी लसीकरण आयोजित करण्यात आले होते. या ठिकाणी लाभार्थ्यांना पहिला व दुसरा डोस देण्यात येणार होता. पाऊस सुरू होता तसेच शेतीकामातून सवड मिळाली असल्याने महिला वर्गाची संख्या मोठी होती. त्यामुळे सकाळी सात वाजेपासून येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत रांगा लागल्या होत्या. सायंकाळी पाच वाजेपर्यंत लसीकरण सुरू होते.

Web Title: Rains throughout the day in Nandurshingote area