नाशिकला रेड अलर्ट, गंगापूर धरणातून पाणी सोडणार; SDRF टीम लोकांच्या मदतीला पोहचणार
By Suyog.joshi | Updated: August 4, 2024 19:51 IST2024-08-04T19:50:38+5:302024-08-04T19:51:02+5:30
गंगापूर धरणातून वाढीव विसर्गामुळे महापालिकेने नदीकाठच्या नागरिकांना, तसेच झोपडपट्टीधारकांना सतर्कतेचे आदेश दिले आहे.

नाशिकला रेड अलर्ट, गंगापूर धरणातून पाणी सोडणार; SDRF टीम लोकांच्या मदतीला पोहचणार
नाशिक - पावसाचा वाढता जोर लक्षात घेता नाशकात मुंबईहून एसडीआरएफ (स्टेट डिझास्टर रिस्पाँस फोर्स) रात्री उशिरापर्यंत दाखल होणार आहे. हवामान खात्याने पुणे आणि नाशिक येथे रेड अलर्ट जाहीर केल्यानंतर त्याची मंत्रालयातून दखल घेण्यात आली. मंत्रालयातून ही एसडीआरएफची ३० जणाांची टीम पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या टीमची व्यवस्था महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे.
मंत्रालयातून एनडीआरएस (नॅशनल डिझास्टर रिकव्हरी सपोर्ट) ही टीम पाठविण्याबाबतही येथील प्रशासनाला विचारणा झाली. मात्र, सद्य:स्थितीत एसडीआरएफची टीमची मागणी करण्यात आली आहे. गंगापूर धरणातून रात्री उशिरापर्यंत विसर्ग वाढू शकतो. नागरिकांनी सतर्क राहावे, घराबाहेर पडू नये यासाठी मनपाची आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे ठिकठिकाणी वाहनांद्वारे, भोंग्याद्वारे नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे.
गंगापूर धरणातून वाढीव विसर्गामुळे महापालिकेने नदीकाठच्या नागरिकांना, तसेच झोपडपट्टीधारकांना सतर्कतेचे आदेश दिले आहे. त्यानुसार ज्यांची राहण्याची व्यवस्था नाही, त्यांच्यासाठी मनपाच्या निवारागृहात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मनपाचे शहरात दोन निवारा केंद्र असून, त्यात साधारण ७०० ते ८०० जणांची व्यवस्था होऊ शकते.