पावसाळा जनावरांसाठीही घातक; करा लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:15 IST2021-07-27T04:15:47+5:302021-07-27T04:15:47+5:30
जनावरांना दिवसभर चरायला सोडू नये. कारण जनावर दिवसभर कोवळे गवत खाते. त्यासाठी पावसाळ्यात पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार पोटफुगीवर औषधे आणून ठेवावीत. ...

पावसाळा जनावरांसाठीही घातक; करा लसीकरण
जनावरांना दिवसभर चरायला सोडू नये. कारण जनावर दिवसभर कोवळे गवत खाते. त्यासाठी पावसाळ्यात पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार पोटफुगीवर औषधे आणून ठेवावीत. जेणेकरून जनावरावर वेळीच उपचार करता येतील. पोटफुगी आजारावर प्रथमोपचार म्हणून अर्धा लिटर गोडेतेलात ४० मि.लि. टर्पेंटाइन, १०० ग्रॅम सोडा व ५ ग्रॅम हिंग मिसळून आजारी जनावराला ठसका न लागता हळूहळू पाजावे. या बरोबरच पावसाळ्यात जनावरांचे पाय सतत पाण्यात राहिल्यामुळे किंवा त्यात चिखल गेल्यामुळे खुरांमध्ये जखमा होतात. सतत ओलावा राहिल्यामुळे अशा जखमा चिघळून त्यावर माशा बसतात आणि जखमेत किडे पडतात. असे झाल्याने जनावरांच्या पायांना वेदना होतात, जनावर लंगडते. परिणामी जनावरांचे चारा खाण्याचे प्रमाण कमी होते व दुग्धोत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. शेळ्या-मेंढ्यामध्ये अशा जखमा झाल्यास त्यांना धनुर्वात होतो.
पावसाळ्यात जनावरांना घटसर्प, फऱ्या, पायलाग यांसारखे संसर्गजन्य आजार होतात. दमट वातावरणात घटसर्पासारखे श्वसनाचे आजार जास्त प्रमाणात दिसून येतात. या आजारात जनावरांच्या छातीत पाणी होते, खालच्या जबड्याखाली सूज येते, श्वासोच्छ्वास करायला त्रास होतो, जनावरास ताप येतो. संसर्ग झालेल्या जनावरांपैकी ९० टक्के जनावरे मृत्युमुखी पडतात. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा उन्हाळ्यात मे-जून महिन्यात जनावरांना या आजारावर प्रतिबंधात्मक लस टोचावी. त्याचप्रमाणे फऱ्या, पायलाग, काळरोग, धनुर्वात याही आजारावर लसीकरण करून घ्यावे. बुळकांडी हा एक विषाणूजन्य आजार असून, पॅरामिक्सो नावाच्या विषाणूमुळे होतो. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे संसर्गाचे प्रमाण पावसाळ्यात अधिक असते. दुर्गंधीयुक्त जुलाब, जिभेवर, आतड्यांवर तसेच त्वचेवर बारीक पुटकुळ्यांसारखे फोड येतात. ताप येऊन डोळ्यांतून व नाकातून पाणी वाहते. डोळे लालसर होतात. तोंड येते, पातळ-चिकट-दुर्गंधीयुक्त शेण पडते, बऱ्याच वेळी दोन्ही मिश्रित शेणही पडते. शरीरातील पाणी कमी होऊन जनावरांना तीव्र अशक्तपणा येतो व ४ ते ८ दिवसांत जनावर दगावणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे या आजाराविरुद्ध लसीकरण करणे व गोठ्यांची नियमित स्वच्छता करणे, तसेच लागण झालेल्या जनावरांना इतर जनावरांपासून वेगळे बांधणे गरजेचे आहे.
- डॉ. विष्णू गर्जे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, नाशिक
(फोटो २६ गर्जे)