नाशिक : भुसावळ येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक संशयित राजकिरण सोनवणे आणि किरण सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आल्यापासून ते फरार असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने भुसावळ येथे सोनवणे याच्या घरात राबविलेल्या शोधमोहिमेत तब्बल ४१ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचा उपनिरीक्षक संशयित राजकिरण सोनवणे व किरण माधव सूर्यवंशी (३७, रा. नवीन हुडको, भुसावळ) यांच्यावर जळगाव जिल्ह्यातील फैजपूर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील सोनवणे हा फरार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आपली कारवाई सुरूच ठेवत त्याचे घरही सीलबंद केले होते.
दरम्यान संशयिताच्या नातेवाइकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तोही न झाल्याने अखेर भुसावळ येथील विशेष न्यायालयाची परवानगी घेऊन शुक्रवारी (दि.२९) सकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसमक्ष संशयिताच्या राहत्या घराची झडती घेण्यात आली. त्यामध्ये तब्बल ४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. संशयित राजकिरण सोनवणे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असून, त्याच्या नातेवाइकांकडे शोध घेऊनदेखील माहिती मिळालेली नाही.
याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घागरे- वालावलकर, पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे पुढील तपास करीत आहेत.
जप्त केलेली मालमत्ता
एक लाख ४९ हजार २९० रुपयांच्या देशी-विदेशी बॅण्डच्या तब्बल दोन हजार १४४ मद्याच्या बाटल्या, अडीच हजार रुपये किमतीची दोन प्लॅस्टिक कॅनमध्ये २५ लिटर गावठी हातभट्टीची दारू, दोन लाख १५ हजार रुपये किमतीची दुचाकी, १४ लाखांच्या कारची कागदपत्रं, दीड लाख रुपये किीमतीचे तीन तोळ्यांचे दागिने, आठ लाखांची रोकड, तब्बल १८ लाख रुपयांच्या सोने-चांदी खरेदी केल्याच्या मूळ पावत्या, दोन लाख रुपये किमतीचे टीव्ही, फ्रिज, एसी व इतर आरामदायी वस्तू, एकूण ४० लाख ९८ हजार ४४ रुपयांचा मुद्देमाल.