कृषकमध्ये हंगामात २९५ टन आंब्यावर विकिरण प्रक्रिया
By Admin | Updated: July 24, 2014 01:01 IST2014-07-23T22:32:46+5:302014-07-24T01:01:12+5:30
लासलगावमार्गे फळांचा राजा अमेरिकेत!

कृषकमध्ये हंगामात २९५ टन आंब्यावर विकिरण प्रक्रिया
लासलगाव : दर्जेदार अन् परदेशी पाठवण्यालायक कांदा अधिक काळ टिकावा यासाठी लासलगावी उभारण्यात आलेल्या डॉ. भाभा अणुसंशोधन केंद्राच्या कृषक या विकिरण केंद्रात गेल्या सात वर्षांपासून कांद्यावरील विकिरण प्रक्रिया बंद झाली असून, त्याची जागा फळांचा राजा आंब्याने घेतली आहे. यंदा सुमारे २९५ टन आंबा लासलगावमार्गे अमेरिकेत पोहोचला आहे. गतवर्षाच्या तुलनेत १४ टन आंब्याची अधिक विकिरण प्रक्रिया झाली हे विशेष.
चालू हंगामात विकिरण प्रक्रियेनंतर गेल्या ३० एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर बारी यांच्या उपस्थितीमध्ये चार निर्यातदारांचा ६.५ टन हापूस व केसर आंबा अमेरिकेत पाठविण्यात आला होता. सन २००९ पासून येथील डॉ. भाभा अणुसंशोधन केंद्राच्या कृषकचे कामकाज पणन महामंडळाच्या अख्त्यारित सुरू असून, उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर बारी, अधिकारी सुशील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राचे शास्त्रज्ञ आंब्यावर विकिरण प्रक्रिया करतात.
गेल्या वर्षी २८१ मेट्रिक टन आंबा अमेरिकेत रवाना झाला होता. यंदा २९५ टन विकिरण प्रक्रिया केलेला आंबा अमेरिकेला पाठविण्यात आला.
संपूर्ण आशिया खंडामध्ये कांद्याचे उत्पादन लक्षात घेऊन महाराष्ट्रात डॉ. भाभा अणुसंशोधन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र शासनाने लासलगावजवळ असलेल्या कोटमगावजवळ १४ एकर जागा १९९८ साली अवघ्या पाच लाख रुपयात केंद्राला दिली.
कोबाल्ट ६०ची मात्रा वापरून गॅमा किरणांच्या साहाय्याने कांदा, बटाटे यासह विविध मान्यताप्राप्त खाद्यपदार्थांवर विकिरणाची सुविधा या केंद्रात आहे. कांद्यावर या प्रकल्पातून विकिरण केले तर कांदे लवकर न सडणे, कांद्याला कोंब येण्याला आळा बसतो. तसेच कांदा चवीवर कोणताही परिणाम होत नाही.
एप्रिल २००७ पासून अमेरिकेच्या कृषी उत्पादन निर्यात विभागाने भारतीय आंबा उत्पादक किटकनाशक वापर करीत असल्याने विकिरण केलेला आंबा आयात करण्यास परवानगी दिली. तत्पूर्वी अमेरिकेच्या कृषी विभागाने तज्ज्ञांनी भेट देऊन केंद्राची व प्रक्रियेची पाहणी केली होती.
एप्रिल २००७ पासूनच आंब्यावर विकिरण प्रक्रिया झाली अन् तेव्हापासूनच कांद्यावर विकिरण प्रक्रिया होत नाही. मुख्यत्वे कांद्याकरिता लासलगावी सुरू झालेल्या या केंद्रातून कांदाच तब्बल सात वर्षांपासून विकिरण प्रक्रियेकरिता हद्दपार झाला आहे.