- अझहर शेख, नाशिक राधा, दुर्गा, समृद्धी ही मुलींची नावे जरी असली, तरी या नावांचे बिबट्याचे बछडे आईपासून दुरावलेल्या दीड वर्षाच्या 'परी'च्या आता चांगल्या मैत्रिणी बनल्या आहेत. नाशिक तालुक्यातील कोटमगावात नवजात अवस्थेत सापडलेल्या 'परी'चे पश्चिम वनविभाग व रेस्क्यू बचाव संस्थेकडून दीड वर्षापासून ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये संगोपन केले जात आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सुरुवातीला ती एकटीच होती; मात्र मागील काही दिवसांपासून या मैत्रिणी तिला येथे मिळाल्या आहेत. दुर्गा मोठी असल्याने परीची गट्टी राधा अन् समृद्धीशी जमलेली दिसते. येथे या बछड्यांचे योग्य संगोपन होत आहे.
नाशिक जणू बिबट्यांचे माहेरघर...
परिस्थितीशी जुळवून घेण्याचे वरदान मिळालेल्या बिबट्या या मार्जार कुळातील प्राण्याच्या संरक्षणाबाबत जनजागृतीकरिता दरवर्षी ३ मे रोजी आंतरराष्ट्रीय बिबट्या दिन साजरा करण्यात येतो.
सुजलाम् सुफलाम् असा बागायती नाशिक जिल्हा जणू बिबट्यांचे माहेरघर म्हणून सर्वदूर ओळखला जात आहे. भारतीय वन्यजीव कायद्यांतर्गत अनुसूची-१मध्ये या वन्यप्राण्याला संरक्षण प्राप्त आहे.
विविध जखमी प्राण्यांवर उपचार
बिबट्यासारख्या विविध जखमी वन्यप्राण्यांकरिता वनविभागाकडून सुसज्ज असे ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर उभारण्यात आले आहे. हे सेंटर रेस्क्यू चॅरिटेबल या वन्यप्राणी संवर्धन क्षेत्रात कार्यरत संस्थेच्या नाशिक डिव्हिजनकडून सुरळीतपणे चालवले जात आहे. याठिकाणी चारही बिबट्या मादी बछड्यांचे संगोपन-संवर्धन मागील काही महिन्यांपासून केले जात आहे.
बिबट्यांच्या मादी बछड्यांच्या आईसोबत पुनर्भेटीचाही प्रयत्न करण्यात आला होता; मात्र त्यात यश आले नाही. यामुळे या दोन्ही बछड्यांसह जखमी अवस्थेत सापडलेल्या बछड्याचे याठिकाणी संगोपन करण्यात येत आहे. सर्व प्राण्यांची योग्य काळजी घेतली जाते. येथील सुसज्ज टीटीसीची वास्तू जखमी वन्यप्राण्यांसाठी वरदान ठरत आहे. -प्रशांत खैरनार, सहायक वनसंरक्षक