सिन्नर तालुक्यात तीन ठिकाणी क्वॉरण्टाइन सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 00:05 IST2020-04-14T22:53:03+5:302020-04-15T00:05:47+5:30
आगासखिंड येथील शताब्दी इंजिनिअरिंग महाविद्यालय, मुसळगाव शिवारात रतन इंडियाचे (इंडिया बुल्स) वसतिगृह व वावी येथील गोडगे पाटील विद्यालयात क्वॉरण्टाइन सेंटर सुरू करण्यात आले असून, प्रत्येक केंद्रावर १५० क्वॉरण्टाइन बेडची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राहुल कोताडे, पंचायत समितीचे उपसभापती संग्राम कातकाडे यांनी दिली.

आगासखिंंड येथील क्वॉरण्टाइन सेंटर.
सिन्नर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून, तालुक्यात तीन ठिकाणी क्वॉरण्टाइन सेंटर उभारण्यात आले आहेत. तालुक्यातील आगासखिंड येथील शताब्दी इंजिनिअरिंग महाविद्यालय, मुसळगाव शिवारात रतन इंडियाचे (इंडिया बुल्स) वसतिगृह व वावी येथील गोडगे पाटील विद्यालयात क्वॉरण्टाइन सेंटर सुरू करण्यात आले असून, प्रत्येक केंद्रावर १५० क्वॉरण्टाइन बेडची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राहुल कोताडे, पंचायत समितीचे उपसभापती संग्राम कातकाडे यांनी दिली.
तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला असून, संबंधित रुग्ण ज्यांच्या संपर्कात आला असेल अशा नागरिकांची तपासणी करण्यात येणार असून, ज्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असतील अशा व्यक्तींना १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यासाठी आगासखिंड येथील शताब्दी महाविद्यालय, मुसळगाव शिवारात रतन इंडियाचे वसतिगृह व वावी येथील गोडगे पाटील विद्यालयात विलगीकरण केंद्र उभारण्यात येत असून, प्रत्येक ठिकाणी सुमारे १५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी वसतिगृहाची इमारत असून, बऱ्याच सुविधा उपलब्ध आहेत. तसेच कमी मनुष्यबळात जास्त लोकांच्या विलगीकरणाची व्यवस्था होणार आहे.
गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड या विलगीकरण कक्षाच्या नोडल अधिकारी म्हणून काम पाहत असून, ग्रामसेवक, आरोग्य विभाग व इतर पंचायत समितीतील यंत्रणा त्यांना सहाय्य करणार आहेत.