पुढच्या सिंहस्थात गोदावरीचे शुद्धीकरण
By Admin | Updated: February 22, 2015 00:19 IST2015-02-22T00:19:03+5:302015-02-22T00:19:28+5:30
देवेंद्र फडणवीस : निधी कमी न पडू देण्याचा पुनरुच्चार

पुढच्या सिंहस्थात गोदावरीचे शुद्धीकरण
नाशिक : विद्यमान सरकारच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होत असल्याने काही तरी चुका होणारच, परंतु अशा चुकांमधून मार्ग काढून चांगल्यात चांगले नियोजन करण्याचा प्रयत्न सरकार करेल व आगामी बारा वर्षांनंतरच्या कुंभमेळ्याचे नियोजन हा कुंभ संपताच दुसऱ्या दिवसापासून केले जाईल, अशी घोषणा करून आत्तापासूनच नियोजन केल्यास आगामी कुंभमेळ्यात गोदावरीचे स्वच्छ व निर्मळ दर्शन निश्चित घडेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी विविध साधु-महंतांच्या मागण्या जाणून घेतल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळा सर्वात मोठे पर्व आहे. हे पर्व पूर्णपणे सफल करण्याची ताकद सरकारमध्ये नाही, तर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरामध्ये आहे, सरकार फक्त सेवकाच्या भूमिकेत आहे. विद्यमान सरकारला कुंभमेळ्याची तयारी करण्यासाठी अवघ्या सहा महिन्यांचा कालावधी मिळाल्यामुळे काही तक्रारी वा नाराजी असू शकते; परंतु अशाही परिस्थितीत नियोजनात कोणतीही कमतरता भासू नये यासाठी राज्यातील अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांवरच त्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नियोजनासाठी राज्य सरकार निधीची कमतरता भासू देणार नाही, असा पुनरुच्चारही त्यांनी केला. त्र्यंबकेश्वरचे धार्मिक महत्त्व इतके मोठे असल्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वरला धार्मिक तीर्थस्थळ म्हणून घोषित करण्याची गरज नाही, असे सांगून आगामी सिंंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन हा कुंभमेळा संपताच दुसऱ्याच दिवसापासून केले जाईल, जेणे करून तो परिपूर्ण व्यवस्थेत पार पाडता येईल. त्यामुळे येणाऱ्या कुंभमेळ्यात गोदावरीचे स्वच्छ व निर्मळ दर्शन होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. त्र्यंबकेश्वर येथे मांसविक्री बंद करण्याच्या मागणीबाबत सरकार आवश्यक ते प्रयत्न करून साधु-महंतांच्या भावनेचा आदर केला जाईल. त्याचबरोबर घाट विस्तारीकरणाबाबत शक्यतांची पडताळणी केली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी बोलताना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी कुंभमेळा ऐन पावसाळ्यात येत असल्याने प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी केली असल्याचे सांगून, देशात सर्वात चांगला कुंभमेळा पार पाडण्यासाठी सर्वतोपरि प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली. आगामी काळात आपण दर आठवड्याला त्र्यंबकेश्वरला भेट देणार असून, एप्रिल महिन्यापासून आठवड्यातून तीन दिवस व त्यानंतर सलग महिनाभर मुक्कामी थांबणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष सागरानंद महाराज, हरिगिरीजी महाराज, नरेंद्रगिरीजी महाराज यांनीही मनोगत व्यक्त केले. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी प्रारंभी सिंंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाचा गोषवारा प्रास्ताविकात मांडला. यावेळी सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार निर्मला गावित, बाळासाहेब सानप, त्र्यंबकच्या नगराध्यक्ष अलका शिरसाठ, उपनगराध्यक्ष रवींद्र सोनवणे, अतिरिक्त सचिव आनंद कुलकर्णी, मनीषा म्हैसकर, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह आदि उपस्थित होते. जोड