पावणेचार कोटींची उपकरणे खरेदी
By Admin | Updated: September 11, 2016 01:38 IST2016-09-11T01:38:16+5:302016-09-11T01:38:30+5:30
कृषी विभाग : सौर पथदीप, सौर पंप, सौर प्रकल्पांचा समावेश

पावणेचार कोटींची उपकरणे खरेदी
नाशिक : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत सुमारे पावणेचार कोटी रुपयांची सौर उपकरणांची खरेदी करण्यात येणार असून, जिल्हा नियोजन समितीमार्फत यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे कळते.
अल्पभूधारक शेतकऱ्यांना वेगवेगळ्या रकमांच्या अनुदानावर सौर उपकरणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत मुख्य चौकात उभारण्यात येणाऱ्या सौर पथदीपांसाठी १० टक्के लोकवर्गणीची अट असते. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत जिल्ह्णातील ग्रामपंचायतींना अनुदानावर सौर पथदीप पुरविण्याची योजना असून, त्यासाठी १ कोटी ४४ लाखांचे सौर पथदीप ग्रामीण भागात पुरविण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना विद्युत सौर पंपाची आवश्यकता पाहून १ कोटी २८ लाखांचे सौर विद्युतपंप खरेदी करण्यात येणार आहेत.
त्याचप्रमाणे २ किलो वॅटच्या सौर विद्युत प्रकल्पासाठी अनुदान देण्यात येणार असून ही सौर विद्युत प्रकल्पाचे साहित्य पुरविण्यासाठी १ कोटींची तरतूद करण्यात आली
आहे.
तसेच जिल्हा परिषदेच्या शहरातील शासकीय कन्या शाळेतही १० किलो वॅटचा सोलर पॉवर प्लॅन्ट सौर विद्युत प्रकल्प बसविण्यात येणार असून त्यासाठी १० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. वरील चारही प्रकारच्या सौर उपकरणांसाठी ११ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान कृषी विभागाकडून संबंधित सौर उपकरणाच्या कंपन्याकडून निविदा मागविण्यात येणार आहेत.
मागील वर्षी सौर पथदीपांच्या निविदांमध्ये घोळ झाल्याने कृषी विभागाला दुबार निविदा काढण्याची वेळ आली होती. आधी जयपूरच्या (राजस्थान) कंपनीला सौर पथदीप पुरविण्याचा दिलेला ठेका वेळेत पूर्ण न झाल्याने दुसऱ्यांदा निविदा काढून नंतर गुजरातस्थित एका कंपनीला देण्यात आला होता. (प्रतिनिधी)