‘सूत्रसंचालनासाठी’ पुस्तकाचे प्रकाशन
By Admin | Updated: October 13, 2016 00:08 IST2016-10-12T23:48:23+5:302016-10-13T00:08:34+5:30
‘सूत्रसंचालनासाठी’ पुस्तकाचे प्रकाशन

‘सूत्रसंचालनासाठी’ पुस्तकाचे प्रकाशन
नाशिक : विविध कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालकांची भूमिका महत्त्वाची असून त्याने योग्य मेळ साधणे देखील आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामिने यांनी बुधवारी (दि. १२) रवींद्र मालुंजकर लिखित ‘सूत्रसंचालनासाठी’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले.
त्र्यंबकरोड येथील गोदावरी सभागृहात या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महामिने यांनी रवींद्र मालुंजकर यांच्या विविध आठवणी सांगून त्यांचा जीवनप्रवास उलगडून सांगितला. या प्रकाशन सोहळ्यादरम्यान लेखक रवींद्र मालुंजकर यांनी शालेय जीवनापासून पुस्तक वाचनाची निर्माण झालेली गोडी तसेच पुस्तकातील महत्त्वाचे टिपण लिहून ठेवणे या सवयीमुळे हा टप्पा गाठल्याचे नमूद केले.
प्रकाशक विलास पोतदार यांनी उत्तर महाराष्ट्रातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळावे, यासाठी आपण प्रयत्न करत आहोत असे सांगताना प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकांचा ग्रंथवाहिकेतून राज्यभर प्रवास सुरू असल्याचे सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुणे उन्मेष गायधनी , माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, प्रा. बाळकृष्ण अंजनगावकर यांनीही विचार मांडले. प्रास्ताविक विजयकुमार मिठे यांनी, तर सूत्रसंचालन प्रशांत केंदळे यांनी केले. (प्रतिनिधी)