जनता युतीला त्यांची जागा दाखवेल
By Admin | Updated: September 27, 2016 02:00 IST2016-09-27T01:59:43+5:302016-09-27T02:00:09+5:30
राजाराम पानगव्हाणे : कॉँग्रेसचा तालुका मेळावा उत्साहात

जनता युतीला त्यांची जागा दाखवेल
नाशिक : आगामी निवडणुकांमुळे जनता भाजपा-शिवसेना युतीला त्यांची जागा दाखवून धडा शिकवणार आहे. नाशिक तालुका हा कॉँग्रेसच्या विचारांचा तालुका असल्याने या तालुक्यातून सातत्याने कॉँग्रेसचे सदस्य निवडून येत असल्याचे प्रतिपादन कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी केले.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसेच नवीन तालुकाध्यक्ष नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर येथील कॉँग्रेस भवनात नाशिक तालुका कॉँग्रेसच्या मेळाव्याचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राजाराम पानगव्हाणे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी नूतन तालुकाध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव, शहराध्यक्ष शरद अहेर, प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, विधानसभा प्रभारी श्याम तायडे, जिल्हा उपाध्यक्ष रतन जाधव आदि उपस्थित होते. पानगव्हाणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून जनतेला भूरळ घालणाऱ्या भाजपा-शिवसेना युतीचा दोन वर्षांचा कार्यकाळ जनतेने पाहिला आहे. त्यामुळे मतदार आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपा-शिवसेनेला धडा शिकवून त्यांची जागा दाखवतील. यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड यांनी सांगितले की, माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ दिला जाणार नाही. बैठकीचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य प्रवीण लोखंडे यांनी केले. आभार अंबादास ढिकले यांनी मानले. कार्यक्रमात नंदकुमार कर्डक, माजी नगराध्यक्ष अॅड. अकबर सय्यद, माजी नगरसेवक लक्ष्मण मंडाले, अॅड. इलियास खतीब, जिल्हा सरचिटणीस प्रशांत बाविस्कर, पी. के. जाधव, बी. डी. करंजकर, मोहन करंजकर, अॅड. अशोक आडके, पंचायत समिती सदस्य प्रकाश बदादे, पांडुरंग काकड, अविनाश गायकवाड आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)